Wednesday, February 15, 2006

आतल्यासहीत माणूस

दि.१३ फ़ेब्रु.ला संध्याकाळी ‘आतल्यासहीत माणूस’ या नीरजा पटवर्धन दिग्दर्शित कार्यक्रमाचा निमंत्रितांसाठी आणि पत्रकारांसाठी असलेला खास प्रयोग पाहिला.कार्यक्रमाला श्री.मोहन आगाशे यांची विशेष उपस्थिती होती.
मायबोलिकरांच्या (www.maayboli.com या वेबसाईटवर लिहिणार्यांच्या) समान धागा असलेल्या निवडक कविता सूत्रात गुंफ़ून त्यातिल आशय उलगडवून दाखवतांना दृक-श्राव्य माध्यमाचा उत्तम वापर असलेला हा प्रयोग आहे. कार्यक्रमाच्या माहितिपत्रिकेत नीरजा म्हणते की, “ स्वत:चा शोध हे सूत्र या सगळ्या कवितांच्या मूळाशी आहे.’माणुस असणं’ या कल्पनेचा हे कवी सतत शोध घेत असतात.या कवितांबद्दल ही गोष्ट मला सगळ्यांत अधिक भावली.म्हणुन या कविता नाट्यरुपाने रंगमंचावर आणायचा प्रयत्न केला आहे.”

या कविता नाट्यरुपाने प्रस्तुत करतांना कवितांच्या ओळी याच संवाद आहेत.कोणत्याही प्रकारचे निवेदन किंवा सुत्रसंचालन यात नाही.एकातून एक उलगडत जाणार्या कविता सादर करतांना अभिनय,संगित आणि प्रतिके यांचा उत्तम समतोल साधला आहे.यात अभिनय करणारे सर्व कलाकार नवखे आहेत.पण त्यामुळेच सादरीकरणातला जोश आणि प्रवाह सळाळता राहिला आहे.

आशयगर्भ असा हा प्रयोग दिसण्यातही तितकाच आकर्षक आहे.नीरजा म्हणते त्याप्रमाणे दृक भागामध्येही नाट्यात्मकतेची मोठी ताकद असते. मनातला गोंधळ,मनाचा आणि जीवनाचा बंदिस्तपणा दर्शवितांना दोर्यांचा वापर तसेच मुक्ततेला दृश्य रुप देण्यासाठी केलेला रंगीबेरंगी ओढण्या तसेच प्रकाशाचा वापर यातून ही नाट्यात्मकतेची ताकद जाणवत राहते. योग्य जागी संगिताचा वापर हा या प्रयोगाचा अजून एक plus point म्हणता येईल.संगित राहुल रानडे यांचे आहे.

या प्रयोगात सहभागी केलेल्या कवितांचे कवी आहेत; स्वाति केळकर ,दीपक जाधव, गिरीश सोनार,हेमांगी वाडेकर,पराग बुडुख,वैशाली सोनपत्की,पेशवा, क्षिप्रा आणि नीरजा पटवर्धन.निर्मिती,संहिता,वेषभूषा आणि दिग्दर्शन नीरजा पटवर्धन.

दि.१६ फ़ेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता पुण्यात सुदर्शन रंगमंच,शनिवार पेठ,पुणे येथे शुभारंभाचा प्रयोग आहे.

सकाळ मध्ये आलेली बातमी :
http://www.esakal.com/20060214/pune26.html