Saturday, April 26, 2008

हसण्यांतली गंमत

हसण्याचे फायदे अनेक असतात म्हणे! मला एक फायदा व्यवस्थित आठवतो. तेव्हा मी आणि माझा एक मित्र डिप्लोमा कॉलेजात ‘मास्तरकी’ करायचो. आम्हा दोघांना हसण्याचा भारीच नाद असल्याने आणि आम्ही अगदी दणकून हसत असल्याने बरीच पब्लिक आमच्यापासून चार हात लांबच रहायची. ‘लेक्चरर’ पदाचा आणि हसण्याचा संबंध असू नये या तत्वाची बरीच लोक्स असतात तशीच ही पण होती! आमच्या संस्थेचे चेअरमन फारच ‘कडक’ प्रकारातले होते. त्यांना मिटींग घेण्याची भारीच हौस! महिना अखेरीस तर केव्हा मिटींगसाठी फर्मान निघेल याचा नेम नसायचा. बरं,वेळ ठरवून आणि विषयानुसार मिटींग हा प्रकार काही या चेअरमन साहेबांना मान्य नव्हता. पाचला मिटींग ठरवून सातपर्यंत वाट पहायला लावून मिटींग रद्द करण्यात तर चेअरमन साहेबांना स्वर्गसुख मिळत असे. राजकारणी शिक्षणसम्राट असल्याकारणाने त्यांच्या विद्यादानाच्या अनेकविध ‘सोसायट्या’ होत्या. शाळेत शिकवणारा असो की इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य असो,सगळे त्यांच्या लेखी ‘मास्तरच’! त्यामुळे मिटींगच्या खेळात विविध प्रकारचे मास्तर एकत्र आणले जात आणि चेअरमन साहेब सगळ्यांना फैलावर घेत. पगारवाढीच्या काळात तर साहेब अधिकच आक्रमक होत की जेणेकरुन मास्तरांनी आधीच बॅकफूटला खेळावे आणि दबूनच पगाराबद्दल बोलावे. खास शिव्या खाण्यासाठी त्यांनी एक दोन शिपाई ठेवले होते. मिटींग चालू व्हायच्या वेळेला सगळी मास्तरं जमल्यावर, काहीतरी खुसपट काढून या शिपायांची आई बहीण काढायची आणि मगच मिटींग सुरू करायची असा दंडक न चुकता पाळला जाई. त्यामुळे सगळ्या मास्तरांची अवस्था मेंढरासारखी होत असे. आम्ही काही दोनचार डोकी सोडली तर इतरांची नोकरी पणाला लागल्यासारखी असायची. त्यातच खास ग्रामीण ढंगातल्या शिव्या असायच्याच.

तर,अश्याच एका मिटींगला आम्हीही होतो. याआधी फक्त ऐकून माहीत असलेल्या मिटींगला जायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. माझ्या मित्राने दोन-तीन मिटींग खेळलेल्या असल्याने खूप करमणूक होते आणि दोन दिवस नंतर हसून पोट दुखते ,असे त्याने सांगितलेच होते. सगळे मास्तर एकदाचे केबिनमध्ये शिरले.आम्ही कोपऱ्यातली जागा पटकावली होतीच. एका शिपायाला काहीतरी कारणाने जोरजोरात झापणे सुरू झाले. यथावकाश त्याच्या आई बाप बहीण आणि इतर खानदानाचा जुजबी आणि नंतर नीटच उद्धार चेअरमन साहेबांनी सगळ्या मास्तरांसमोर केला. इकडे मी आणि माझा मित्र फुटण्याच्या बेतात आलेलो. हसणे दाबण्याचा पराकोटीचा प्रयत्न पाहून बाजूला गंभीरपणे बसलेल्या मास्तरांचा चेहरा जास्तच गंभीर झाला. तो प्रसंग कसबसा निभावून नेला. नंतर डी.एड. की तत्सम कॉलेजच्या हेडमास्तराला काही तरी विचारणा सुरू झाली. मग एका क्लार्कभाऊसाहेबांना बोलावले गेले. ते घाबरतच आत आले. चेअरमन साहेब अगदी ओसंडून वाहू लागले. आम्ही पुन्हा फुटायच्या बेतात आलो. साहेबांनी खास ठेवणीतली अहिराणी शिवी बाहेर काढली आणि आम्ही फुटलोच. आमच्या रांगेतले मास्तर गंभीर चेहरा करून ‘तो मी नव्हेच’ दाखवू लागले. त्यांना तशी गरज नव्हतीच कारण आम्ही अजूनही फिदीफिदी हसत होतो. चेअरमनने लक्ष आमच्यकडे वळवले. आम्ही कोण म्हणून विचारणा झाली. मग त्यांच्या ‘पिये’ ला खडसावून सांगितले की पुन्हा डिप्लोमाच्या मास्तरांना मिटिंगला बोलवायचे नाही. आम्ही तसेच बाहेर पडलो आणि दोन दिवस हसत राहिलो. आमच्या हास्यफुटीमुळे पुन्हा दोन वर्षात डिप्लोमाच्या मास्तरांना मिटींगला बोलावले गेले नाही.

हसण्याची गंमत अशीच असते. सभ्यतेच्या नियमांमुळे जेव्हाचं तेव्हाच हसता नाही आले तर नंतर राहून राहून ती गोष्ट आठवत राहते आणि हसू पिच्छा सोडत नाही. मला तर रात्री बेरात्री उठल्यावरही असे काही आठवून हसायला येत राहते. आता परवाचीच गंमत! पंधरा दिवस पायदुखीने बेजार झाल्यावर एका डॉक्टरला पकडले. त्यांनी एक्स-रे काढायला सांगितला. मणक्यातली गॅप कमी झाल्यामुळे हा त्रास होतो म्हणाले. मग कमरपट्टा दिला,विविध गोळ्या औषधे चालू झाली. वेदना तर असह्य होत्या. दुचाकीपासून ट्रेकिंगपर्यंत अनेक गोष्टींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे लोकांनी डॉकटर,वैद्य,वैदू सुचवले. मी फारच हवालदिल झालो. जन्मात आता नीट चालता येईल की नाही अशी शंकाही येऊन गेली. एका लग्नाला गेलो तर तिथे नाचावे की न नाचावे अश्या जीवनमरणाच्या संभ्रमात मी पडलो. ताल चालू झाला तसा प्रश्न लगेच सुटला म्हणा! पण एकूणच गरोदर बाईसारखी माझी स्थिती झाली आहे. फारच जपून सगळे करावे लागते. शेवटी एका प्रथितयश डॉक्टरांकडे गेलो. अगदी जडावल्या पायाने आणि अंतःकरणाने केबिनमध्ये गेलो. एक्स-रे पण जपून काढून त्यांच्या हातात दिला. उगीच त्याला धक्का लागून माझी हाडं खिळखिळी होतील अशी भीति वाटत होती. काय काय होते ते सांगितले. डॉक्टरांनी अगदी हलगर्जीपणाने तो एक्स-रे हातात घेतला आणि त्यावर एक बाण दाखवला होता तिथे निर्देश करून बोलण्याच्या बेतात आले. मी मन घट्ट करून जन्मभर बेल्ट लाववा लागेल पासून मणके बदलावे लागतिल पर्यंत ऐकण्याची तयारी ठेवली. चेहरा अधिकाधिक गंभीर केला. त्यांनी बाणाकडे बोट दाखवून सांगितले,” यात जे दाखवले आहे ना… ”… हलकासा पॉज आणि माझे मणकेपण कानात आले.. अगदी कुत्सितपणे एक्स-रे कडे पाहत त्यांनी वाक्य पुरे केले “ तसलं काहीही तुला झालेलं नाहिये”… मी फुटण्यापासून स्वतःला सावरले. त्यांचे पुढचे सल्ले आणि व्यायामाचे प्रकार ऐकतांना मला सारखं हसू दाबून ठेवावं लागत होतं.

अश्या दाबलेल्या हसण्याचा त्रास असा की तो प्रसंग सारखा डोळ्यासमोर येऊन पुन्हा पुन्हा हसू येत राहतं. एकट्याने असल्यावर काही नाही पण चार-चौघात असे काही आठवले तर खूपच पंचाईत होते. पुन्हा दाबले तर त्याची तीव्रता वाढतेच पण असे अनेकानेक प्रसंग उगीच आठवायला लागतात. यावर मी एक उपाय शोधला आहे. तो सगळा किस्सा एकदोघांना सांगितला की जरा हलके वाटायला लागते. तसाच वरचा प्रसंग मी एक दोघांना सांगून झाला. पण काही फायदा होईना. शेवटी इथे लिहून त्याचा प्रसार करावा आणि हसण्यातली गंमत तुम्हालाही सांगावी म्हणून…. खीखीखी!!!!