Tuesday, October 9, 2007

ऐसे चूप है.....

परवा सहज म्हणून म्युज़िक वर्ल्ड मध्ये फ़ेरफ़टका मारतांना एका सीडीवर नज़र गेली. पहिलेच गाणे नूरजहाँचे 'चाँदनी राते' होते.त्यापूर्वी ते रिमिक्स प्रकारात ऐकलेले होते. त्याचे मूळ गाणे मिळाले म्हणून आनंद झाला.बाकी गाणी ही गज़ल,गीत वगैरे प्रकारातली होती. नूरजहाँच्या बरोबरीने मखमली आवाज होते रुना लैला ,मल्लिका पुखराज आणि फ़रिदा खानम यांचे! बऱ्याचदा आपण एका गाण्यासाठी सीडी आणतो आणि दुसरे एखादे न ऐकलेले गाणेच मनात घर करून जाते. यावेळेसही तेच झाले. रूना लैला ची आपल्या ओळखितली गाणी म्हणजे 'दमा दम मस्त कलंदर' आणि घरौंदामधलं 'तुम्हे हो न हो'! 'तुम्हे हो न हो' मध्ये प्रेमाला नकार देतांनाच त्याचीच कबूली देणारी रुना लैला खूपच आवडली होती. दमादम मस्त कलंदर मध्ये भेटणाऱ्या रुना लैलापेक्षा ही घरौंदामधली रुना लैला जाम आवडली होती. यापेक्षा वेगळी गाणी मात्र मी ऐकली नव्हती. त्यामुळे यातली तिची ३-४ गाणी एका अर्थाने पर्वणी वाटली. मात्र ज्या गज़लेने मेजवानी घडवली ती म्हणजे 'ऐसे चूप है'.. अहमद फ़राजची ही गज़ल गज़ल म्हणून आवडलीच पण रुना लैलाच्या आवाजामुळे डब्बल मेजवानी घडल्याचा आनंद मिळाला.आता मी हे सगळे शब्दांत सांगतोय म्हटल्यावर मर्यादा येणारच.. म्हणून इथे फ़क्त गज़लेचे शब्दच लिहू शकतो. प्रत्यक्षात मला भेटलात तरीपण माझ्या आवाजात मी काही ऐकवणे म्हणजे शिक्षाच राहील तुम्हाला! त्यापेक्षा शब्दांनाच गोड मानून घ्या.. :)
ऐसे चूप है के मंज़िल कडी हो जैसे

तेरा मिलना भी जुदाई की घडी हो जैसे

(या मतल्यानेच मी अडकलो म्हणाना! सानी मिसरा अगदी कयामत वाटला!)
मंज़िले दूर भी है मंज़िले नज़दिकभी है

अपने ही पांव मे ज़ंजीर पडी हो जैसे

(लक्ष्यापर्यंत पोचण्यात मलाच अडचणी इतक्या आहेत की काय सांगू!)कितने नादान है तेरे भुलाने वाले के तुझे

याद करने के लिये उम्र पडी हो जैसे

(शेर-ए-हासिल म्हणावा असा हा शेर. यातल विरोधाभास चकित करतोच करतो! एका उत्तम शेराचं लक्षण म्हणून सहज देता यावा असा हा शेर!)

आज दिल खोल के रोये है तो यूं खुश है 'फ़राज़'

चंद लम्हो की ये राहत भी बडी हो जैसे

हीच गज़ल गुलाम अलीनीही गायली आहे. मी अजून ऐकले नाही त्यांचे वर्जन. पण विफ़लतेची जी भावना रुना लैलाच्या आवाजातून व्यक्त झाली आहे तशी मला नाही वाटत गुलाम अलींनी आणली असेल. पहिल्या प्रेमासारखीच बहुदा गाण्यांची प्रथम ऐकलेली वर्जन्स जास्त आवडत असावीत. :)

म्हणूनच म्हणतो,कधी तुम्हाला ऐकायला मिळाली ही गज़ल आणि आवडलीच तर माझी आठवण जरूर काढा!

Thursday, June 7, 2007

जनरल अरुण श्रीधर वैद्य

५ जून १९८४,३१ ऑक्टोबर १९८४,१० ऑगस्ट १९८६...... आठवतात का कुणाला या तारखा? कदाचित ३१ ऑक्टोबर आठवत असेल.पण हे तिन्ही दिवस एकमेकांशी जोडलेले आहेत. ५ जून १९८४.. भारतिय सेनेच्या इतिहासातिल सगळ्यांत वादग्रस्त ्मोहिम 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' याच दिवशी सुरु केली गेली.३१ ऑक्टोबर ला इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यांनीच सेनेला पंजाब ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते की ज्याची परिणति 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मध्ये झाली. १० ऑगस्ट १९८६ ला जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली.'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' मागील मुख्य सूत्रधार म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.

हे सगळे आठवायचे कारण की मी जिथे राहतो तिथून पाचच मिनिटांच्या अंतरावर जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या झाली ते ठिकाण आहे.आणि तिथे फक्त एक साधा फलक आहे जो त्या जागेचा इतिहास चार वाक्यात सांगून मोकळा होतो. अगदी बाजूलाच कुंपणाच्या भिंतिंमुळे तयार झालेला कोपरा असल्याने तिथे कचरा साचून राहतो. अश्या परिस्थितीत त्या जागेचे महत्व कुणाला माहीत असणे तसेअवघडच आहे. मी रोज येताजाता त्या फलकाकडे पाहून 'काय बरे असेल इथे?' असा विचार करत पुढे जात असे.पण एकदा आवर्जून दुचाकी थांबवून मी वाचून काढला तेव्हा कळले की हेच ते ठिकाण जिथे खलिस्तानवादी अतिरेक्यांनी आपला सूड घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्या जागेची साफ़सफ़ाई करण्यात आली आणि बांधकामाचे साहित्य येऊन पडले.आता तिथे अर्धवर्तुळाकार आकारात बांधकाम सुरु झालेय. लवकरच तिथे एक स्मारक आकाराला येईल असे दिसतेय.बहुदा १० ऑगस्ट या त्यांच्या स्मृतिदिनी तिथे एक भव्य स्मारक दिसेल.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार' बद्दल त्यांच्याकडे कोणतेच वैयक्तिक अथवा राजकिय कारण नव्हते. त्यामुळेच कर्तव्याप्रति घेतलेल्या निर्णयांचा मोबदला चुकवावा लागलेल्या जनरल अरुण श्रीधर वैद्य यांच्या उपेक्षित स्मारकाला योग्य न्याय मिळतोय असेच मला वाटतेय.'

लष्कराच्या हद्दीत कोणत्याही वस्तूचा,स्मारकाचा किंवा इमारतिचा फोटो घेणे म्हणजे मार खायला आमंत्रण असते हा माझा नेहेमीचा अनुभव आहे.अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी बोलून सुटका करुन घेतलिये मी खूपदा! त्यामुळे दुर्लक्षित स्मारकाचा फोटो काढणण्याचे धाडस केले नाही. आता नूतनिकरण केलेल्या स्मारकाचा जमल्यास फोटो काढिन म्हणतो! :)

Sunday, April 29, 2007

बहावा आणि दोन छोटुले...

दिनेश यांचे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=940700#POST940700 हे लिखाण वाचून बहावा आठवला. माझ्या जीवनात(??? हे हे हे! काहीही म्हणतात लोकं ना!!!) बहाव्याचा संदर्भे आला तो 'आला शिशिर संपत'या कवितेत.. त्यातला 'बहाव्याने जेथे तेथे सोनतोरण बांधिले' ले पहायला मला वयाची २४ वर्षे वाट पहावी लागली. भारत संचार निगमच्या नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बहाव्याचं पहिलं दर्शन झालं. तेव्हा ते सोनतोरण पाहूनही तो बहावा आहे हे लक्षात आलं नाही.त्यासाठी पुन्हा ३ वर्ष जावी लागली आणि दिनेशशी ओळख व्हावी लागली.गोव्यात असतांना सुटीच्या दिवशी ते माझ्या घरी आले की निरुद्द्येश्य अशी अगदी रमत गमत भटकंती व्हायची आमची! त्यात गप्पा मारतांना झाडा-पानांपासून तर लावणी-नाट्यसंगितापर्यंतच्या विषयांवर ते बोलत रहायचे आणि मी ऐकत रहायचो. अश्याच एका भटकंतित माझ्याच घरासमोर असलेला आणि मला आवडत असलेला तो वृक्ष बहावा आहे हे त्यांनीच सांगितलं. तेव्हा कुठे मला 'सोनतोरण' आणि कवितेचा संदर्भ लागला!! (येडच्यापच आहे ना मी! ) त्याच्या शेंगेतला गोड गरही त्यांनीच सांगितलं म्हणून खाऊन पाहिला तर खूप आवडला.

तर हा असा बहावा,त्यांच्या उपरनिर्देशित लेखामुळे पुन्हा आठवला! ( आता २ वर्षांनंतर!) माझ्या घराच्या बाजूलाच असलेल्या बंगल्यात अगदी फुलून आलेला दिसला.फ़ोटो काढायचाच असे ठरवून शनिवारी आत शिरलो.बंगल्यात मालक राहत नाहीत पण कधी मधी येत असतात त्यामुळे केअर टेकर कुटुंबे तिथेच आऊट-हाऊस मध्ये राहतात.त्यांना विचारायचं म्हणुन त्यांच्या घराजवळ जाऊन आवाज दिला तर त्या बाई आणि त्यांची दोन छोटुली बाहेर आली.मुलगा ६-७ वर्षांचा तर मुलगी ३-४ वर्षांची असावी.मी फ़ोटो काढू का म्हटले तर त्या थोड्या घाबरून 'कशाचे?का?काय करणार त्याचे?' म्हणून विचारू लागल्या. मी त्यांना सांगितले पण त्यांनी रिस्क न घेता सासूबाईंवर निर्णय टोलवला.मी सांगितले की बंगल्याचे फ़ोटो घेणार नाही फ़क्त झाडाचे घेईन आणि तुम्हाला दाखवीन मगच् तुम्ही म्हणाल तर सेव्ह करीन.आणि फ़ोटो काढण्यासाठी झाडाजवळ जाऊ लागलो.तर हा छोटा मुलगा आईच्या मदतीला धाऊन आला आणि जोरजोरात आजीला बोलावू लागला.वर मला म्हणतो की थांबा आजी म्हळाली तरच काढा म्हणून! मला त्याची गंमत वाटली.तितक्यात आजी बंगल्यातले काम ताकून बाहेर आल्या आणि त्यांनीही सूनबाइंप्रमाणेच प्रश्न विचारले.त्यांनाही उत्तरे दिली पण त्याही थोड्या साशंक दिसल्या.मीमुलाकडे पाहून याचेही फ़ोटो काढतो म्हटल्यावर पोराने आजी आणि आई दोघींना न जुमानता फ़ोटो काढा म्हणाला. काहिका असेना,मला फ़ोटो काढायला परवानगी देणारे 'छोटे सरकार' अगदी उत्साहात आले आणि बहीणीला चड्डी घालून ये म्हणून फ़र्मावले. झाडासोबत दोघांचे एक दोन फ़ोटो काढून लगेच त्यांना दाखवले तर त्या बाबाचा हट्टच सुरू झाला. एकामागून एक लोकेशन्स शोधून इथे फ़ोटो काढा,तिथे फ़ोटो काढा म्हणू लागला. एक फ़ोटो चिंचेच्या ढिगाऱ्याजवळ,दुसरा सायकलवर,तिसरा हसतांना,चवथा बोलत असतांना अजून एक कमरेवर हात ठेवून असे बरेच फ़ोटो काढावे लागले.मला कटायचे होते पण त्याचा उत्साह संपेना. वरून प्रत्येक फ़ोटो काढला की बहीणीला,आईला,आजीला दाखवावा लागे! शेवटी डोळे वटारून उद्या येतो परत म्हणून सांगितले तेव्हा स्वारी थोडी मऊ झाली!या सगळ्या प्रकारात बहाव्याचे (माझ्या दृष्टीने) चांगले फ़ोटो मिळालेच पण दोन येडच्याप पोरांशी ओळख झाली म्हणून खूपच आनंद झाला!त्या बंगल्यात भरपूर झाडं आहेत. आता एकेकाच्या बहराच्या काळात झाडांचे आणि पोरांचेही फ़ोटो काढत जाईन!

तर असे हे बहावा फ़ोटो पुराण दोघा छोट्यांच्या फ़ोटोने सुफ़ळ संपूर्ण!!! :)

Friday, January 19, 2007

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी आहे:

वेळ मिळेना कशाचसाठी
आठवत राही तिचेच हसणे
जाई सारा वेळ खरे तर
सोसत हसण्या आधीचे रुसणे!