Sunday, April 30, 2006

घाटाचे आश्रमातून दिसणारे दृश्य!
गगनगिरी आश्रम!
घाटातले एक वळण!
तळ्याकाठची संध्याकाळ- सावंतवाडी!नापण्याचा धबधबा!

Saturday, April 29, 2006

घाट आणि गगनगिरी!

भर दुपारच्या उन्हात गगनबावड्याचा घाट चढायचा होता आणि त्याआधी बराच पल्ला गाठायचा होता.त्यातच माझं हेल्मेट अगदीच विचित्र होतं.काच वर जायची नाही आणि रहायचीही नाही.जर जोराजोरी करून वर केली तर वार्याने हेल्मेटच मागे सरकायचं.गोव्याच्या मानाने या भागात उष्णता जास्त होती.उन्हाचे चटकेही भाजून काढणारे होते.त्यातच मी टी शर्ट घातलेला असल्याने कोपरापासून पुढे चांगलेच चटके बसत होते.उष्ण हवेच्या झळा शरीरावरून जातांना वेगळाच अनुभव देत होत्या.हळून मन मागे गेलं ते पाच वर्षांपूर्वी अश्याच उन्हात दुचाकीवरून केलेल्या धुळे_सप्तशृंगी_ सापुतारा या प्रवासापर्यंत! ते तर भर मे महिन्यांतलं खांदेशातलं उन होतं आणि तापमान बेचाळीस पंचेचाळीस अंशांच्या दरम्यान! पुढचे चार महीने तरी आम्ही काळेकुट्ट दिसत होतो. तश्याच उन्हाच्या झळा आताही नाकातून फुफ्फुसापर्यंत जाणवत होत्या.पण फार जुनी ईच्छा पूर्ण होणार होती घाट पार करण्याची त्यामुळे त्यातही आनंदच वाटत होता.उन्हापासुन वाचण्यासाठी पुन्हापुन्हा पाणी,सरबते रिचवणं चालूच होतं.रणरणत्या उन्हाचं एक गोलाकार वळण आलं आणि घाटाला सुरवात झाली.बारा किमी चा हा घाट सध्या भरपूर रहदारीचा घाट आहे.सध्या गोव्याला जाणारी सर्वच वाहने फ़ोंडा मार्गे न जाता गागनबावडा घाटातूनच जातात.रात्रीच्या वेळी रस्ता अक्षरशः वाहत असतो.गोव्यातून पुण्याला येतांना आणि पुन्हा गोव्यात जातांना चार वर्षात अनेकदा या घाटाने गेलो होतो.वर चढतांना उंचच उंच वाटणारा डोंगर हळूहळू आपल्यपेक्षा बुटका होत जातांना पहायचा तर घाट उतरतांना हाच डोंगर उंच होतांना पहायचा. एक वाजेच्या सुमारास या घाटांत गाडी पोचते.रात्र चांदण्यांची असो की चंद्राची,घाटाचं सौंदर्य भुरळ पाडतंच! चंद्राच्या रात्री घाट उतरतांना सह्याद्रीच्या कड्याचे भयचकीत करणारे दर्शन होत राहते.दरी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही आणि वळणावळणाच्या रस्त्याची भीती वाटत राह्ते.मात्र चांदण्यांच्या रात्री घाटभर चांदण्या पसरलेल्या आहेत असे वाटत राहते.एखाद्या १८० अंशाच्या वळणावर तर गाडी चांदण्यांतच शिरते आहे असे वाटून जाते.पण हे सगळं रात्रिच्या प्रवासासाठीच आहे.आम्हाला मात्र टळटळीत दुपारचा घाट पार करायचा होता.घाट म्हटला की भरपूर वळणे आलीच.अश्याच रस्त्यावरून दुचाकी चालवण्याचा आनंद काही औरच असतो.या वळणदार रस्त्यावर 'वेडी वाकडी वळणे' असे लिहीलेली पाटी भरपूर ठिकाणि लावलेली आढळते. वळणे वळणदारच असतात.त्यातही वाकडि वळणे ही थोडी मोठी ईयत्ता! मात्र वेडी वाकडी वळणे म्हणजे हद्दच झाली,अगदी पदवीच! हा शब्द शोधून काढणारा महानच असला पाहीजे!या असल्या वेड्या वळणांवर 'वाहने सावकाशा चालवा' म्हणुन लिहिलेले असते मात्र मला अश्या ठिकाणी नेमकी जोरात चालवावीशी वाटतात!वळणं वेडी असतिल म्हणून काय झालं,मी त्यांच्यापेक्षा वेडा! अश्याच काही वळणांवर थांबून आम्ही कोकणचे सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेर्यात साठवून घेत होतो. १८० अंशांची काही वळणे तर इतकी अप्रतिम दृश्ये दाखवतात की बस्स!घाटातही इतर वाहनांशी पंगा घेण्याचा प्रकार चालूच होता.या घाटतून पूर्णवेळ गगनगिरी आश्रमाचे दर्शन होत राह्ते.रात्रिच्या प्रवासात तर गगनगिरीवरचे दिवे तार्यांशीच स्पर्धा करत असतात!असेच खेळत आणि निसर्गाच्या याही रुपाचा आस्वाद घेत आम्ही गगनबावडा गावात पोचलो तेव्हा एक वाजत आलेला.तसेच पुढे गगनगडावर पोचलो.एका डोंगरावर बांधलेला हा आश्रम म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल.तिथे जायला सध्या अर्धपक्का रस्ता आहे.पण पूर्वी तिथे पायवाटही नसावी.अश्या जागी हा आश्रम डोंगराशी सहजीवन साधत बांधून काढला आहे.आवश्याक इतकेच आधुनिक बांधकाम आणि बाकी दगडांचा नैसर्गिक आकार यांचा उत्तम वापर केलेला आहे.ते पाहून मला ग्रीसमधल्या पुरातन प्रार्थनास्थळांची आठवण झाली!(भले मी तिथे गेलेलो नाही तरीही!)सध्या महाराज इथे राहत नाहीत.पाण्यात उभे राहून तपश्चर्या केल्याने माश्यांनी त्यांचे तळवे आणि पाय खाऊन टाकले आहेत आणि त्यामुळेच त्यांना चालता येत नाही.तिथे गेल्यावर मामांचा पाय मुरगळला असल्याचे लक्षात आले.पण तरीही ते बर्याच पायर्या चढून आले.तिथे थोडा वेळ घलवून पुन्हा वर चढलो तर तिथे एक सभामंडप होता. त्यात दत्ताची आणि गगनगिरी महाराजांची मनुष्याकृति मूर्ती अगदी जिवंत वाटावी अशीच होति. क्षणभर दोन्ही मूर्त्या नसुन जिवंत माणसेच आहेत असा भास होत होता.हा भाग सर्वात उंच अस्ल्याने एका बाजूला गगनबावड्याचा घाट तर दुसर्या बाजूला भुईबावड्याचा घाट दिसत होते.असल्या डोंगरांमधून रस्ते शोधून काढणर्या माणसाचे नवल आहे.आज सर्वेक्षणाची आधुनिक साधने आहेत. पण देशावरून कोकणात उतरायला घाट फ़ार पूर्वीच बांधले गेले होते.असाच एक नाणेघाट आम्ही भर पावसार ट्रेक करून पार केला होता.हा सातवाहनकालिन घाट सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा आहे. धन्य धन्य!
आम्ही घाटांचं निरीक्षण करत असतांनाच पोरांचा एकच गलका ऐकू आला. तिकडे पाहिलं तर पाच सात वर्षांची चिमुरडी पोरं एका सरड्यापेक्षा मोठ्या प्राण्याच्या मागे धावाधाव करत होति.तिथे जाऊन पाहिलं तर घोरपडीचं एक पिलू चुकून या गडबडीत आलं होतं आणि वाट न सुचून इकडे तिकडे पळत होतं. मग त्याचे फ़ोटो काढण्याचा एक सोपस्कार पार पडला. जेवणाची वेळ झाल्याने पोटात कावळे ओरडू लागले होते आणि गावात जेवणाची अपेक्षत व्यवस्था होनार नाही म्हणुन आम्ही भुईबावड्याचा घाट उतरू पुन्हा कोकणात जावून जेवायचा बेत केला.दुसरं कारण म्हणजे गावात मिळणारं कोल्हापुरी झणझणैत जेवण आम्हा दोघांनाही त्रासदायक ठरलं असतं.पुन्हा पाऊण तास तरी भूक सहन करावीच लागणार होती.मग काय? निघालो!पुन्हा Vroooooooom!

Thursday, April 20, 2006

प्रसन्न सकाळ म्हण्जे काय तर आदल्या दिवसाचा सगळा शीण विसरायला लावणारी सकाळ!उठल्या उठल्या या प्रसन्नतेचा अनुभव घेतला.अहाहा!रात्री आजूबाजूचा परीसर दिसला नव्हता.आता मात्र एकेक नज़ारे पहायला मिळत होते.हॉटेलच्या मागच्याच भागात नदी वहात होती.मी टंगळमंगळ करेपर्यन्त दिनेश तिकडे फ़ेरफ़टका मारून आले होते.त्यांनी काही फ़ोटोही काढले होते.मग मी तयार होताच माझे एक फोटोसेशन झाले.:)सकाळी लवकरच निघायचे असल्याने न्याहरीची व्यवस्था हॉटेल करू शकले नाही पण चहा पिऊन आम्ही निघालो.तळेरे गाव येताच जरा पोटपूजा आटोपली.तिथे कोकम सरबत मागवले तर हे भल्या मोठ्या ग्लासात अगदी मधूर सरबत मिळाले.तृप्त होऊन निघालो.आता नापणे गाठयचे होते.नापण्याची ख्याति अशी की येथे एक धबधबा आहे की जो बारामहीने वाहतच असतो.कोकणाच्या आसपास असा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.गोव्याचा दूधसागरही उन्हाळ्यात अगदीच कृश होतो.जसजसे पुढे जात होतो तसतसे जंगल थोडे विरळ होत चालले होते..मध्ये रस्त्यात विविध वाहनांशी रेसिंग चालूच होते.एका ट्रकवाला काही सईड देईना.बराच वेळ त्याच्या अगदी मागे मागे राहून ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला तर हा बाबा ऐनवेळेला गाडी उजव्या बाजूला घ्यायचा आणि आमचा प्रयत्न हाणून पाडायचा.पुढे येणार्या वळणार याला मागे टाकयचंच ठरवून आमच्या घोड्याला टाच मारली.वळणावर थोडी स्पेस मिळताच मी आमची दुचाकी दामटली आणि त्याला ओव्हरटेक करतांना चांगलाच दम भरला.तो काय हातवारे करतोय तिकडे ल़क्षही न देता.दुप्पट वेगाने गाडी दामटली.गगनबावड्याच्या दिशेने जातांना वैभववाडी लागले.तिथे नापण्याविषयी विचारले तर ते मागेच राहिले होते.पुन्हा मागे आलो तर पुन्हा रस्त्यात आमचा प्रिय ट्रकवाला समोरून येतांना दिसला.पुन्हा त्याच्या दिशेने बेफ़िकीरीने पहात आणि हॉर्न वाजवत मी सुसाट सुटलो.वैभववाडीच्या अलीकडे रेल्वे क्रॉसिंगच्या आधीच नापण्याला जाणारा फ़ाटा लागतो.तिकडे चौकशी करत करत नाप्ण्याच्या दिशेने निघालो.आता तर अजूनच वैराण दिसायला लागले.बारमाही धबधबा कुणाची तरी टवाळी असावी असं वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली.आणि अचानकच पुढ्यात काही मंडळी दिसू लागली.खालच्या दरीसारख्या भागातून पाण्याचा आवाज येत होता.त्यामुळे अगदी हायसं वाटलं.इथे झाडाच्या सावलीत मंडळी पत्त्यंचा डाव मांडून बसली होती.बरोबरीने 'आनंद'प्राशन चालू होते.मला असल्या लोकांची गंमत वाटते.या गोष्टी तर घरी बसूनही करता येतिल.मग उगाच मरमर करत एखाद्या निसर्गरम्य स्थळी येऊन पुन्हा तेच करत बसायचे.पुन्हा झाडा-पाना-फ़ुलांकडे वळूनही पहायचे नाही.जमल्यास 'झलक दिखलाजा' करत नाचायचे आणि तसेच कोरडेठाक राहून नाही नाही ती घाण तिथेच सोडून निघून जायचे.आम्ही आपला एक किंव करणारा कटाक्ष त्यांच्यावर टाकून धबधब्याकडे मोर्चा वळवला.पुढे जाऊन पहातो तर २५-३० फ़ूटांवरून पाणी उड्या घेत होते.जरा पुढे गेलं की पायथ्याशी उतरता येतं.तसंच खाली उतरलो.मी आपला लांबूनच निरीक्षण करत होतो.याआधी धबधब्यावरच्या दोन जीवघेणे प्रसंगांपासून मी पाण्यात उतरत नाही.आधीच पोहता येत नाही त्यात आगाऊपणा नको म्हणून मी काठाकाठानेच मजा घेत होतो.दिनेशना पाणी पाहिलं की उतरायचा मोह आवरत नाहीच.ते लगेच पाण्यात उतरले.मग मी पाण्याला वळसा घालून धबधब्याच्या अगदी खालीच पोचलो.तिथून वर चढून जायची तीव्र ईच्छा कशीबशी आवरली.तोपर्यन्त ऊन चंगलेच चटके देऊ लागले होते.पुढे निघायला हवे होते.गगनबावड्याचा गगनगिरी आश्रम आम्हाला खूणावत होता.तिथे जायला अर्धा पाऊण तास लागणार होता.ऊन मी म्हणत होते.आमचा घोडा पुन्हा भरधाव फ़ेकला.

Saturday, April 15, 2006

गोव्यातून बावड्याला जायचं म्हणजे सावंतवाडी-कणकवली-तळेरे असा मार्ग आहे.तळेरे पर्यंत हा मुंबई महामार्ग असल्याने खूप दिवसांपासून विसरून गेलेलं सुसाटणं मला आज अनुभवायचं होतं.हाताशी ऍव्हेंजर असल्याने बांदा येईपर्यंत अगदी सुसाट सुटलो.सावंतवाडीच्या अलीकडे इन्सुलीचा घाट लागतो.हा आमच्या प्रवासातला पहिला घाट! यातच गाडीची क्षमता कळून चुकली.मग काय ८०-९० चा वेग म्हणजे अगदी गल्लित असल्याप्रमाणे गाठला!हा घाट चढताच हवेत उष्मा जाणवू लागला.सावंतवाडीला पोचलो तोच गावात वळण्याच्या इराद्याने. पण मामांनी आठवण करून दिली की आता योगेश(माझा मित्र)ही तिथे रहात नाही.अगदी खट्टू होऊन मोतितलावाच्या काठाने चालू लागलो.सहा-साडेसहाची वेळ असल्याने वाडीकर फ़ेरफ़टक्याला निघालेले.तलावाला तसंच मागे सोडून जाववेना.मग काठाशी असणार्या पॉम्पस या रेस्टॉरंटमध्ये जरा कॉफ़िपान उरकण्यासाठी थांबलो.नजरेच्या एका टप्प्यात येणारा मोतितलाव पाहतांना कितितरी आठवणी जाग्या झाल्या.माझ्यासाठी सावंतवाडी म्हणजेच मोतितलाव,असा अर्थ आहे.तलावाभोवताली पसरलेला वाडीचा विस्तार,त्याला मर्यादित करणारे डोंगर,त्यातलाच एक नरेंद्र डोंगर,त्याच्या शिखरावर जातांना लागणारं अरण्य,शिखरावरून दिसणारं टुमदार सावंतवाडी आणि तलावाकाठी सूर्यास्ताच्या जोडीने केलेल्या गप्पा..... एवढं सगळं किती क्षणांत समोर यावं? मनाला मर्यादा नसतात हे मात्र खरं!परत यायला कधी जमेल माहीत नाही.अगदी निःशब्दतेने पुढचं मार्गक्रमण सुरू झालं.आपसूकच वेग कमी झाला.एव्हाना सूर्यास्त झाल्याने जड वाहानांनी रस्त्याचा ताबा घ्यायला सुरवात केली होती.त्यांचे हेडलाईट अगदी वैताग आणतात.त्यातच कोकणातले रस्ते अगदी वळणावळणांचे!आमचं पहिलं लक्ष्य होतं नापणे येथिल बारमाही धबधबा.त्यामुळे गगनबावड्याला सरळ न जाता रात्री कणकवलीतच मुक्काम ठोकायचं ठरलं.कण्कवलीच्या अलीकडेच एक चांगलसं हॉटेल पाहून तिथे उतरायचं ठरलं.जेऊन झाल्यावर एक फ़ेरफ़टका मारला.तिथेच एक शांत मंदीरात थोडा वेळ शांत बसलो.अविरत वाहणार्या रस्त्याकाठीही इतकी शांतता लाभू शकते.अंथरुणात पडताच झोप लागेल इतकं दमूनही झोप न लागणे याला काय म्हणावे?झोपेची आराधना करत असतांना केव्हातरी उशीरा झोप लागली.

Wednesday, April 12, 2006

गोव्याला जायचं काही निश्चित होत नव्हतं,पण जायचं मनात अगदी पक्कं होतं.मागच्या आठवड्यात दोन आणि या आठवड्यातल्या दोन मिळून चार दिवस सुट्टी मिळाली.माझ्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत मी जाणार की नाही हे मलाच माहीत नव्हतं.काही अडचण न येता मी उधळलो ते थेट गोव्यातच धडकलो.निघतांना गोव्यातल्या एप्रिलच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल हे अगदी ठरवून गेलो.मनात कोणतेच plan न ठरवता तिथे गेल्याने इडूकल्या (चिमण्या इडल्या)हादडून सकाळी जो झोपलो तो अकरा वाजेलाच उठलो.अति झोपेने अंगात जडपणा येतो तसा आलेला.त्याची मजा लूटत गॆलरीत आलो तर अनपेक्षितपणे गार वारा सुटलेला.खरं तर या काळात सगळ्या कोकणपट्टिचं रुपांतर भट्टीत झालेलं असतं.इथे उकाडा असतो तर खान्देश-विदर्भात उष्णता असते.पण हवेचं हे सुखद रुप अजूनच सुखावून गेलं.सगळा जडपणा आपोआपच गळून गेला.वार्याबरोबर काजूच्या बहराचा गंध आणि जवळच असलेल्या कढीपत्त्यांच्या झुडूपांचा गंध एक वेगळीच रेसिपि तयार करत होता.आता वारा कसाही असला तरी पुढचे चार दिवस अगदी मजेत जाणार हे नीटच उमगलं.विचार होता की दिनेशमामांच्याकडची जमतिल तितकी पुस्तकं आणि सिनेमे खाऊन टाकायचे. सोबतिला त्यांनी बनविलेले अजब पण तितक्याच स्वादिष्ट चवीचे विविध पदार्थ असणार होते.उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे यासारखा स्वर्ग नाही!आणि हवे ते लाड पुरवून घेणे यासारखे सुख नाही!दुपारी बरोब्बर १२.३० ला मामा आलेच आणि भरलेल्या भेंड्या,बटाट्याची भाजी,बिनतेलाचं लिम्बू-मिरची लोणचं,मिर्यांचं लोणचं अश्या अनोख्या पदार्थांवर भरपूर ताव मारला.आपण गगनबावड्याला जाऊत असं जेवतांनाच त्यांनी सांगितलं.मध्ये नापणे गावात बारमाही वाहणारा धबधबा बघयचा मग करूळ म्हणजेच गगनबावड्याच्या घाटातून वर जाऊन गगनगिरी महाराजांचा आश्रम पहावा असे ठरले.जमल्यास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच राजापूरलाही जाऊन यायचे असा बेत ठरला. पण जायचं कसं हे काही ठरत नव्हतं.बसने जायचं तर त्यांच्या वेळा पाळायच्या,त्याप्रमणे झोपायचं आणि उठायचं आणि भटकायचं. हे काही माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं. दुसरा पर्याय दुचाकी भाड्याने घेऊन मनमुराद भटकणे,पण एकूण अंतर पाहता चांगली दुचाकी असेल तरच हा प्रयोग राबवायचा असे ठरले.पाच वाजता पणजी पोस्ट ऒफ़िसजवळ एकाशी घासाघीस करत दुचाकी भाड्याने घेतली.मला हवी तीच म्हणजे दूरच्या प्रवासात आरामदायक ठरेल अशी बजाज अव्हेंजर मिळाली,त्यामुळे माझ्या उधळण्याला मर्यादा पडणे शक्य नव्हते.आता थेट गगनबावडा गाठायच्या इराद्याने vrooom.. vroooooom... suuuuuuuuuuu...