घाट आणि गगनगिरी!
भर दुपारच्या उन्हात गगनबावड्याचा घाट चढायचा होता आणि त्याआधी बराच पल्ला गाठायचा होता.त्यातच माझं हेल्मेट अगदीच विचित्र होतं.काच वर जायची नाही आणि रहायचीही नाही.जर जोराजोरी करून वर केली तर वार्याने हेल्मेटच मागे सरकायचं.गोव्याच्या मानाने या भागात उष्णता जास्त होती.उन्हाचे चटकेही भाजून काढणारे होते.त्यातच मी टी शर्ट घातलेला असल्याने कोपरापासून पुढे चांगलेच चटके बसत होते.उष्ण हवेच्या झळा शरीरावरून जातांना वेगळाच अनुभव देत होत्या.हळून मन मागे गेलं ते पाच वर्षांपूर्वी अश्याच उन्हात दुचाकीवरून केलेल्या धुळे_सप्तशृंगी_ सापुतारा या प्रवासापर्यंत! ते तर भर मे महिन्यांतलं खांदेशातलं उन होतं आणि तापमान बेचाळीस पंचेचाळीस अंशांच्या दरम्यान! पुढचे चार महीने तरी आम्ही काळेकुट्ट दिसत होतो. तश्याच उन्हाच्या झळा आताही नाकातून फुफ्फुसापर्यंत जाणवत होत्या.पण फार जुनी ईच्छा पूर्ण होणार होती घाट पार करण्याची त्यामुळे त्यातही आनंदच वाटत होता.उन्हापासुन वाचण्यासाठी पुन्हापुन्हा पाणी,सरबते रिचवणं चालूच होतं.रणरणत्या उन्हाचं एक गोलाकार वळण आलं आणि घाटाला सुरवात झाली.बारा किमी चा हा घाट सध्या भरपूर रहदारीचा घाट आहे.सध्या गोव्याला जाणारी सर्वच वाहने फ़ोंडा मार्गे न जाता गागनबावडा घाटातूनच जातात.रात्रीच्या वेळी रस्ता अक्षरशः वाहत असतो.गोव्यातून पुण्याला येतांना आणि पुन्हा गोव्यात जातांना चार वर्षात अनेकदा या घाटाने गेलो होतो.वर चढतांना उंचच उंच वाटणारा डोंगर हळूहळू आपल्यपेक्षा बुटका होत जातांना पहायचा तर घाट उतरतांना हाच डोंगर उंच होतांना पहायचा. एक वाजेच्या सुमारास या घाटांत गाडी पोचते.रात्र चांदण्यांची असो की चंद्राची,घाटाचं सौंदर्य भुरळ पाडतंच! चंद्राच्या रात्री घाट उतरतांना सह्याद्रीच्या कड्याचे भयचकीत करणारे दर्शन होत राहते.दरी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही आणि वळणावळणाच्या रस्त्याची भीती वाटत राह्ते.मात्र चांदण्यांच्या रात्री घाटभर चांदण्या पसरलेल्या आहेत असे वाटत राहते.एखाद्या १८० अंशाच्या वळणावर तर गाडी चांदण्यांतच शिरते आहे असे वाटून जाते.पण हे सगळं रात्रिच्या प्रवासासाठीच आहे.आम्हाला मात्र टळटळीत दुपारचा घाट पार करायचा होता.घाट म्हटला की भरपूर वळणे आलीच.अश्याच रस्त्यावरून दुचाकी चालवण्याचा आनंद काही औरच असतो.या वळणदार रस्त्यावर 'वेडी वाकडी वळणे' असे लिहीलेली पाटी भरपूर ठिकाणि लावलेली आढळते. वळणे वळणदारच असतात.त्यातही वाकडि वळणे ही थोडी मोठी ईयत्ता! मात्र वेडी वाकडी वळणे म्हणजे हद्दच झाली,अगदी पदवीच! हा शब्द शोधून काढणारा महानच असला पाहीजे!या असल्या वेड्या वळणांवर 'वाहने सावकाशा चालवा' म्हणुन लिहिलेले असते मात्र मला अश्या ठिकाणी नेमकी जोरात चालवावीशी वाटतात!वळणं वेडी असतिल म्हणून काय झालं,मी त्यांच्यापेक्षा वेडा! अश्याच काही वळणांवर थांबून आम्ही कोकणचे सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेर्यात साठवून घेत होतो. १८० अंशांची काही वळणे तर इतकी अप्रतिम दृश्ये दाखवतात की बस्स!घाटातही इतर वाहनांशी पंगा घेण्याचा प्रकार चालूच होता.या घाटतून पूर्णवेळ गगनगिरी आश्रमाचे दर्शन होत राह्ते.रात्रिच्या प्रवासात तर गगनगिरीवरचे दिवे तार्यांशीच स्पर्धा करत असतात!असेच खेळत आणि निसर्गाच्या याही रुपाचा आस्वाद घेत आम्ही गगनबावडा गावात पोचलो तेव्हा एक वाजत आलेला.तसेच पुढे गगनगडावर पोचलो.एका डोंगरावर बांधलेला हा आश्रम म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल.तिथे जायला सध्या अर्धपक्का रस्ता आहे.पण पूर्वी तिथे पायवाटही नसावी.अश्या जागी हा आश्रम डोंगराशी सहजीवन साधत बांधून काढला आहे.आवश्याक इतकेच आधुनिक बांधकाम आणि बाकी दगडांचा नैसर्गिक आकार यांचा उत्तम वापर केलेला आहे.ते पाहून मला ग्रीसमधल्या पुरातन प्रार्थनास्थळांची आठवण झाली!(भले मी तिथे गेलेलो नाही तरीही!)सध्या महाराज इथे राहत नाहीत.पाण्यात उभे राहून तपश्चर्या केल्याने माश्यांनी त्यांचे तळवे आणि पाय खाऊन टाकले आहेत आणि त्यामुळेच त्यांना चालता येत नाही.तिथे गेल्यावर मामांचा पाय मुरगळला असल्याचे लक्षात आले.पण तरीही ते बर्याच पायर्या चढून आले.तिथे थोडा वेळ घलवून पुन्हा वर चढलो तर तिथे एक सभामंडप होता. त्यात दत्ताची आणि गगनगिरी महाराजांची मनुष्याकृति मूर्ती अगदी जिवंत वाटावी अशीच होति. क्षणभर दोन्ही मूर्त्या नसुन जिवंत माणसेच आहेत असा भास होत होता.हा भाग सर्वात उंच अस्ल्याने एका बाजूला गगनबावड्याचा घाट तर दुसर्या बाजूला भुईबावड्याचा घाट दिसत होते.असल्या डोंगरांमधून रस्ते शोधून काढणर्या माणसाचे नवल आहे.आज सर्वेक्षणाची आधुनिक साधने आहेत. पण देशावरून कोकणात उतरायला घाट फ़ार पूर्वीच बांधले गेले होते.असाच एक नाणेघाट आम्ही भर पावसार ट्रेक करून पार केला होता.हा सातवाहनकालिन घाट सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा आहे. धन्य धन्य!
आम्ही घाटांचं निरीक्षण करत असतांनाच पोरांचा एकच गलका ऐकू आला. तिकडे पाहिलं तर पाच सात वर्षांची चिमुरडी पोरं एका सरड्यापेक्षा मोठ्या प्राण्याच्या मागे धावाधाव करत होति.तिथे जाऊन पाहिलं तर घोरपडीचं एक पिलू चुकून या गडबडीत आलं होतं आणि वाट न सुचून इकडे तिकडे पळत होतं. मग त्याचे फ़ोटो काढण्याचा एक सोपस्कार पार पडला. जेवणाची वेळ झाल्याने पोटात कावळे ओरडू लागले होते आणि गावात जेवणाची अपेक्षत व्यवस्था होनार नाही म्हणुन आम्ही भुईबावड्याचा घाट उतरू पुन्हा कोकणात जावून जेवायचा बेत केला.दुसरं कारण म्हणजे गावात मिळणारं कोल्हापुरी झणझणैत जेवण आम्हा दोघांनाही त्रासदायक ठरलं असतं.पुन्हा पाऊण तास तरी भूक सहन करावीच लागणार होती.मग काय? निघालो!पुन्हा Vroooooooom!
No comments:
Post a Comment