Friday, January 27, 2006

स्लॆमबुक

“चल उडजारे पंछी शहर के रास्ते
मेरी प्यारी सहेली को कहना नमस्ते”
किंवा
“ना सलाम याद रखना,ना पैगाम याद रखना,
बस इतनी आरज़ू है,मुझे याद रखना”

सहज जुन्या वस्तू बाहेर काढल्या होत्या.उगीच पडून असलेल्या बिनकामाच्या वस्तू टाकून जागा मोकळी करूयात म्हणून ठिय्या मांडून बसलो. जुने पेपर,मासिकं,कात्रणं,जुन्या वह्या असा सगळा खजिना बाहेर पडला. आवरणं बाजूलाच राहिलं आणि एकेक करून सगळयांवर नज़र फ़िरू लागली,मग हात फ़िरू लागला आणि मनावरची धूळ पुसली जाऊन मग मनही फ़िरू लागलं. मनाला अंतर,तारीख,दिवस असली बंधनं नसतातच! मग काय कुठून कुठे प्रवास चालू झाला. मग आईचं मागे राहून “आवर रे,आंघोळीला बस रे,पाणी गार होतंय!” वगैरेही ऐकू येणं बंद झालं.आई वैतागून आपल्या कामाला लागली. आता पाणी गार होतय ही काय धमकी झाली का? पण कोण सांगणार आईला? मी पुन्हा एकेक कात्रण,वह्या बघत बसलो.वडिलांनी २५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या हिशेबाच्या वह्या तर अगदी मजेशीरच आहेत.मला घेतलेले शर्ट,त्यांच्या रंग आणि किंमतिसह नोंद करून ठेवले होते.तर कुठे शंभर रुपयांत घरच्या सगळ्या किराणामालाचा हिशेब आहे. अगदीच गंमतिशीर!

असंच चाळतांना बहीणीचं हस्ताक्षर दिसलं म्हणून पाहिलं तर तिची SlamBook! बारावी झाल्यावर तिच्या सगळ्या मैत्रिणींनी एकमेकीला ओल्या डोळ्यंानी स्लॆमबुक दिलेल्या लिहायला. त्यात काय लिहू म्हणून माझ्या मागे लागली तर मी त्यांची खिल्ली उडवायचो. या पोरी मात्र अगदी डोळे ओले करकरून त्यात उशीरापर्यंत लिहित बसायच्या. त्या वयानुसार त्यांच्या गोष्टी,गंमति आणि सिक्रेट्स त्यात लिहिलेली सापडू लागली.कुणी लिहिलं होतं,’Spread Sweet Smile’ तर कुणी लिहिलं,’Choose Chikana Chhokara’. हे आणि असले कितिक Short Forms ,मित्रांची सांकेतिक नावं ,उपदेशपर वाक्यं त्यात पेरेलेली दिसत होती.मैत्रिणीही दहा प्रकारच्या दहा!कोण लोढा तर कोण पटेल,कोण अरोरा तर कोणी पाटील! कुचेरीया, जैन, चव्हाण, भावसार, भट्ट, अग्रवाल, भोरसकर,व्यास,गिते आणि कोण कोण आडनावाच्या पोरींनी आम्हाला विसरू नको म्हणून आर्जवं केलेली. मला माहीत आहे बहीणीनेही असलीच काय काय भारूड-भरति तिला लिहायला आलेल्या बुकात लिहिली असणार. मी तेव्हा त्यांची ्खूप टर उडवायचो.पण एव्हढंच असतं का त्या स्लॆमबुकात? नाही! त्यांच्या आवडी निवडी,स्वभाव आणि जातिधर्मानुसार खाण्यापिण्याच्या सवयी यांचीही नोंद असते.नीट वाचतांना उलगडत जातात त्यांची स्वप्नं! जाणत्या-अजाणत्या वयातली स्वप्नं, शिक्षणाविषयीची स्वप्नं,करीअरविषयीची स्वप्नं, घराविषयीची स्वप्नं! त्यांच्या स्वपनातले राजकुमारही हळूच डोकावून जातात या स्लॆमबुकातून! बरं हे काही फ़क्त लिहूनच नाही काय ठेवलेलं! तर वेगवेगळ्या रंगांतून, designs मधून, stickers मधून सुंदर रीतिने सजवून ठेवलेलं हे सुंदर जग मला आज दूर कुठे नेत होतं.मनात विचार आला,कुठे असतिल या सगळ्या चिमण्या? कितीजणी आपल्या मैत्रिणिंची आठवण ठेवून असतिल?किति जणींचा आजही संपर्क होत असेल? त्यांनी पाहिलेली स्वप्नं कुठवर खरी झाली असतिल? आणि याच विचाराबरोबर अजून एक स्लॆमबुक आठवली.पण अगदी निकराने तिला मागे लोटून मी बहीणीच्या स्लॆमबुकमधलं पुढचं पान उलटलं. त्यातला संदेश होता…..
“समृद्धी प्रकृति और संस्कृतिसे आती है,संपत्तिसे नही!”
चमकून खालचं नाव पाहिलं तर तश्याच वळणदार आणि सुंदर झोकदार अक्षरात सही होती मेधा पाटकरांची! त्यावेळी नर्मदा बचावच्या आंदोलनानिमित्त्ताने त्यांना धुळ्याच्या जेलमध्ये ठेवलं होतं.त्यांचे समर्थक आणि आंदोलक जेलबाहेर त्यांना सोडावं म्हणून आंदोलन करत होते.ज्या दिवशी त्यांना सोडण्यात आलं त्याच दिवशी बहिणीने अगदी बहादुरीने त्या गर्दीत शिरून त्यांची स्वाक्षरी आणि संदेश मिळवले होते.त्यांच्या विषयी चांगलं बोलणारे ,वाईट बोलणारे यांची मोठीच संख्या आहे.मला किंवा बहिणीलाही त्याच्याशी कर्तव्य नाही.एका प्रसिद्ध व्यक्तिची स्वाक्षरी मिळावल्याचं समाधान तिच्या चेहर्यावर त्या दिवशी दिसत होतं.आणि आज तो संदेश वाचतांना त्यातला गहन अर्थ मला खूपच आवडून गेला.
पुढचं पान उलटलं तर कोण्या एका मुलीने लिहिलेलं तिचं डॊक्टर व्हायचं स्वप्नं समोर आलं.पुन्हा मनात आलं,खरंच झाली असेल का ही डॊक्टर?की चारचौघींसारखीच संसार एके संसार करत असेल? आणि पुन्हा एकदा मन भूतकाळात गेलं,अश्याच एका स्लॆमबुकमध्ये!

तिनेक वर्षांपूर्वी मामाच्या घरी गेलो होतो तेव्हा मामेबहीण नुकतिच दुसर्या वर्षाची परीक्षा देऊन सुट्टित घरी आली होती.परीक्षेच्या निकालापेक्षा तिला जास्त सतावत होति तिच्या मित्रमैत्रिणींची आठवण! आणि त्यातूनच ती पोचली तिच्या डिप्लोमाच्या काळात! मग कुठूनतरी शोधून तिने त्यावेळची स्लॆमबुक काढली आणि वाचत बसली. मी मात्र मलाही वाचायला पाहिजे म्हणून तिला सतावत राहिलो. शेवटी तिने तो खजिना माझ्या हातात ठेवला.आणि एकेक मैत्रिणीच्या गंमतिजमति सांगायला लागली.मीही त्या विश्वाचा एक भाग बनून गेलो.घरापासून दूर राहिलेल्या पोरा पोरींना मित्रमैत्रिणी म्हणजे जीव की प्राण असतो.तश्याच याही पोरी होत्या.करीअरच्या एका विशिष्ट टप्प्यावर असल्याने यांची स्वप्नंही थोडी वास्तववादी आणि focused होती. सगळ्यांनाच पुढे इंजिनिअरींग करायचं होतं.क्वचित एखादीला अजूनही पुढे शिकायचं होतं.इंजिनिअरींगच्या वेगवेगळ्या शाखांतल्या असल्याने त्या त्या विभागातली सर्वोच्च तर काही सर्वमान्य स्वप्नं बाळगून त्याच्या मागे प्रयत्न करणार्या या मुलींचं जग खरंच खूप सुंदर वाटत होतं.त्यातच कुणा कुणाचे हळवे प्रसंग,आठवणी पुसटश्या ओळीतून प्रकट होत होत्या.कुणी लिहिल्या होत्या हळव्या चारोळ्या,तर कुणी सिनेगीतांतल्या ओळीच दिल्या होत्या आवडीच्या म्हणून! वाचता वाचता एका पानाशी आलो तर पहिली नज़र गेली तिच्या स्वप्नांवर! तिला काही म्हणता करीअर करण्यात रस नव्हता. कुणावर तरी मन जडल्यांचं स्पष्टंच जाणवत होतं.तिला खरा रस होता संसार करण्यात,तिच्या आवडत्या व्यक्तिच्या प्रत्येक आवडीनिवडी पुरवण्यात! मला हे खूपच मजेदार वाटलं म्हणून बहिणीला विचारलं तर तिने अधिक माहिती पुरवली. तिचं रितसर लग्न ठरलं होतं म्हणे आणि तोच तो तिच्या प्रत्येक स्वप्नांत झलक देत होता.ठरवून लग्न असलं म्हणून काय झालं? तसं काय प्रेम होत नाही काय? प्रेमात पडण्याचा क्षण असाही येऊ शकतोच ना! तिच्या सगळ्या आकांक्षा त्याच्याभोवतिच तर फ़िरत होत्या! त्या एका बिंदूभोवति तिची स्वप्नं फ़ेर धरतांना वाटत होती.परीक्षा संपल्यावर काहीच दिवसांत लग्न होणार होतं. म्हणजे ती आता त्याच स्वप्ननगरीत अलगद तरंगत असणार! मी तिचं पान वाचतांना उगीच तिच्या स्वप्नांत डोकावण्याचा प्रयत्न करत होतो. हसून बहिणीकडे पाहिलं तर तिच्याही चेहर्यावर हसू दिसलं.विषण्णपणे हसून तिने सांगितलं, “ लग्नानंतर काहीच महिन्यांत तिच्या नवर्याने तिला जाळून मारलं!” मला ‘काय?’ म्हणायचीही ईच्छा नव्हती.अश्या कथा मी ऐकलेल्या होत्याच आणि जवळपास पाहिल्याही होत्या,त्यामुळे असं होऊ शकतं,यात मला खूप आश्चर्य नव्हतं. वयाच्या नवव्या दहाव्या वर्षीही मुलीच्या अश्याच प्रकारे जाण्याने उध्वस्त झालेलं कुटूंब मी पाहीलं होतंच!पण तिच्या बाबतित हे का झालं असावं? बहिणीलाही माहीत नव्हतं!पाच दहा मिनिटांत तिने लिहिलेलं स्लॆमबुक वाचून मला तिच्याविषयी वाईट वाटत होतं. तिच्या मैत्रिणींना काय वाटलं असेल पहिल्यांदा हे ऐकून?काय धक्का बसला असेल त्यांना?कुठेतरी त्यांच्याही स्वप्नांना तडा गेलाच असेल ना! साधं संसाराचं स्वप्नंही पुरं न होण्यासारखं असं काय बरं केलं असेल तिने? मी तेव्हा तिचं नावही वाचलं नाही. पण त्याने काय असा फ़रक पडणार आहे. नाव काहिही असू शकतं तिचं! अश्याच काही घटना विनाकारण आठवत राहिल्या आणि ती रात्र वाईटच गेली. रात्रिलाही स्वप्नांची भीती वाटली असणार!

आता प्रत्येक वेळी स्लॆमबुक म्हंटलं की हीच गोष्ट आठवत राहते.इतका सुंदर खजिना डागाळलेला वाटतो.्स्लॆमबुक !काही अधुर्या स्वप्नांचा खजिना!

1 comment:

शैलेश श. खांडेकर said...

सुरेख नोंद! खरोखरच साध्या साध्या वस्तु देखिल भूतकाळाचा मोठा खजिना असतात.