Sunday, December 9, 2018

जिंजीचा किल्ला

जिंजीचा किल्ला

पॉंडिचेरीच्या मुक्कामात महाबलीपूरमला  जाऊन  आलो  पण समुद्रकिनाऱ्यावर जायचे राहिले होते. ऊर्जाने हट्ट करून समुद्रावर जायचे पक्के करून घेतले. दुसऱ्या दिवशी आपण सूर्योदय पाहायला जाऊ अशी मीपण मेख मारून ठेवली. ठरल्याप्रमाणे आम्ही जेव्हा पॉंडिचेरीच्या समुद्रावर सकाळी सहाच्या आसपास पोचलो तेव्हा बरेच लोक मॉर्निंग वॉल्कला आणि असेच भटकायला पण आले होते. ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय दिसेल कि नाही हि शंका होतीच. प्रोमेनेड (Promenade) किनाऱ्यावर Le Cafe` नावाचे ऐक रेस्टराँ  आहे जे २४x ७ खुलेच असते.हे पॉंडिचेरी सरकारतर्फे चालवले जाते.  सकाळी तिथल्या टेरेसवर मस्तपैकी नास्ता आणि चहा कॉफी  असाही बेत होता. बराच वेळ सूर्योदय होत नाही म्हणून  आम्ही चालतच Le cafe` कडे निघालो. तिथे पोचलो तर कुणीच दिसेना. आत जायला लागलो तर एकाने तमिळमध्ये हटकले. शितलला कळलेच नाहीय आणि ती सरळ आत निघाली. आणि इकडे जो कर्मचारी होता तो तमिळमध्ये जास्तच भडकला. आमच्या बावळटपणाला पाहून दुसऱ्याने आमची इंग्रजीत सुटका केली. त्या दिवशी पॉंडिचेरी शासनाच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्याने Le Cafe` बंद होते. प्रोमेनेड किनारा  हा वाळूचा किनारा नाही. मोठमोठ्या शिळा टाकून किनाऱ्याची झीज थांबवण्याच्या प्रयत्नात सगळी वाळू नष्ट झाली आहे.काही  काही ठिकाणी २०-२५ मीटरचा भाग वाळूचा आहे. तिथे जाऊन ऊर्जाने समुद्रात भिजून घेतले. मलाही पाण्यात येण्याचा आग्रह केला मग मी हो नाही करत भिजलो. ऊर्जाने विचारले की मी स्वतःच पाण्यात का नाही येत. प्रत्येक वेळी मला आग्रह करावा लागतो. शेवटी तिला सांगितले की तू जशी आपोआप पाण्याकडे वळते तसा मी डोंगराकडे नाहीतर किल्ल्याकडे वळतो. हे सांगताना इथे तामिळनाडूमध्ये किल्ला भेटेल असे काही वाटले नव्हते.

समुद्राचा सोपस्कार झाल्यावर आमचा पॉंडिचेरीचा मुक्काम संपला होता. परत हॉटेलवर येऊन साडेनऊपर्यंत बंगलोरला परत निघायचे होते. तसे आम्ही वेळेत निघालो. रस्तायत पुन्हा एकदा आणि बहुदा शेवटचा तामिळ पद्धतीचा नाश्ता झाला. खरंतर उर्जाला डोसा आवडतो पण इथल्या मुक्कामात डोश्याचा ओव्हरडोस किंवा ओव्हरडोसा झाल्यामुळे ऊर्जाने महिनाभर तरी आता डोश्याचे नाव माझ्यासमोर काढू नका म्हणून ठणकावून सांगितले. नाश्ता होईतो अगदी मुसळधार पाऊस सुरु झाला.

रात्री सव्वानऊला परतीची फ्लाईट असल्याने आम्ही वेळेच्या खूप आधी पोहोचू असा अंदाज होता. आमच्या  ड्रॉयव्हरनेही तसेच सांगितले. पाऊस   असला तरी सहापदरी हायवेमुळे मजेत जाता येत होते. आजूबाजूला दूरवर गावे दिसत होती. पण रस्त्यात आपल्यासारखे ढाबे किंवा हॉटेल्स लागत नव्हती. मध्येच एक मोठे गाव किंवा तालुक्याचे ठिकाण लागले तर तिथे गुगलने सांगितलेला रस्ता बंद होता. वळून दूरवरून एका टेकडीला वळसा घालून निघालो. आता लहानमोठ्या टेकड्या दिसायला लागल्या होत्या. मोठमोठाले खडक सगळीकडेच दिसत होते. टेकड्याही आपल्यासारख्या एकसंध नसून दगडी शिळांचा ढीग लावल्यासारखा होत्या. थोडे पुढे आलो तर लांबून एका टेकडीवर किल्ल्यासदृश तटबंदी दिसत होती आणि पायथ्याशी मोठे गाव होते. अचानक पुढे पाटी लागली. गावाचे नाव लिहिले होते 'जिंजी'! एकदम इतिहास आठवला. शिवाजीमहाराजांच्या दक्षिण व्दिग्विजयात कुठेतरी जिंजी, तंजावर ई. उल्लेख आठवत होता. पण हे तेच असेल कि नाही शंका होती. कारण तमिळमध्ये गावाचे नाव 'सिंजी' आहे असे मंजुनाथ सारथ्याने सांगितले. इंग्रजी स्पेलिंग 'Gingee' असे होते. पुन्हा मंजुनाथ ला विचारले कि शिवाजीमहाराजांचा काही संबंध आहे का या गावाशी तर त्याने हो सांगितले. मग जरा कुतूहल वाढले. गाव ओलांडून गेल्यावर किल्ला असावा असे  दिसत होते.  ऊर्जालापण उत्सुकता होती महाराजांचा किल्ला बघण्याची. गाव ओलांडून एखाद  किलोमीटर गेलो तर उजव्या बाजूला पूर्ण टेकडी आणि किल्ला दिसू लागला. किल्ल्याची तटबंदी उत्तम स्थितीत होतीच पण वरचे इतर बांधकामही चांगल्या स्थितीत असल्याचे दिसले. डाव्या बाजूला अजून दोन उंच टेकड्या दिसत होत्या आणि त्यावरही काही बांधकाम दिसत होते. एका ठिकाणी उजव्या आणि डाव्या टेकडीवर जाण्यासाठी चांगल्या आणि मोठ्या पायवाटा दिसल्या. उजव्या बाजूचा किल्ला पहिल्यांदा दृष्टीस पडल्याने आम्ही तोच किल्ला आहे असे समजून चाललो होतो. त्यासोबतच या टेकडीचा आकार असा होता कि तटबंदी खालच्या उंचीवर होती आणि वरचे मंदीर, आणि इतर बांधकाम स्पष्ट दिसत होते. आता मात्र मला राहवले नाही आणि किमान पायथ्यापर्यंत तरी जाऊन येऊ असा विचार केला. मुख्य रस्त्यापासून पायथ्याचे अंतरही कमी नव्हते. पण वेळ आहे तर जाऊन बघू म्हणून मी आणि ऊर्जा निघालो. शीतलने गाडीतच आराम करायचा बेत पक्का केला. पुढे काय होईल याचा तिला बहुतेक अंदाज आला होता. आम्ही चालायला लागलो ती वाट मी आधी म्हटल्याप्रमाणे पायवाट नसून एका मोठ्या खंदकाच्या तटबंदीचा भाग होता. रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूच्या तीन टेकड्यांच्या किल्ल्याच्या  सुरक्षेचा हा भाग होता. मुळात जिंजीचा किल्ला एक नसून या तीन किल्ल्यांचा समूह आहे. पण नंतरच्या काळातआलेल्या  हायवेमुळे त्यांचा एकसंधपणा  जाणवत नव्हता.
पायथ्याशी आलो तर  Archaeological Survey of India अर्थातच पुरातत्व विभागाचा मोठा  बोर्ड होता आणि एक छोटेखानी ऑफिसही होते. वर जायचे तर २५ रुपयांचे तिकीट काढावे लागते. वर जावे कि न जावे या विचारात असताना पाहिले  तर  अर्ध्या उंचीपर्यंत दगडी पण कोरीव पायऱ्या दिसत होत्या. ऑफिसात विचारले कि वेळ लागतो वर जाऊन यायला तर माहिती मिळाली कि एका तासात याल परत! घड्याळात पाहून अंदाज घेतला तर विचार केला कि परत या वाटेवर आपण कधी येणार? आलोच आहोत तर जाऊन येऊ वर! अचानक भेटलेल्या महाराजांच्या किल्ल्याला असं टाळून पुढे जाणं  बरं दिसणार नाही! महाराज मजल दरमजल करत, एकेक गाव जिंकत इथपर्यंत आले होते. आणि आपल्याला फक्त एक तास देता येत नाही म्हणजे काय! उर्जाला  तर ट्रेक हवाच होता. शेवटी किल्ला सर  करायचा इरादा पक्का केला आणि तिकीट काढायला गेलो. मुलीचे तिकीट लागणार नाही पण मी भारतीय असल्याबद्दल त्याला शंका येत होती. परदेशी व्यक्तींसाठी तिकीटदर वेगळा होता. अजूनही माझ्याकडे पासपोर्ट नाही,मी भारताबाहेर कधी गेलो नाही आणि तो मला कुठल्या पद्धतीने अनिवासी समजत  होता ते त्याचा साहेब नाहीतर देवच  जाणे! शेवटी माझे BSNL चे ओळखपत्र दाखवले तर तो अगदी अगत्याने तिकीट देता झाला!

आम्ही वर जायला निघालो तो जिंजी समूहातील कृष्णगिरी किल्ला होता. याला राणीचा किल्ला म्हणतात. बहुदा राणीवसा या किल्ल्यात असावा. दगडी पायऱ्यांनी वर चढायला सुरवात केली कि लगेच दरवाजा लागतो पण याला बंद करता येईल असा दरवाजा नसून फक्तच कमान आहे. आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठीची जागा आहे. पुन्हा दगडी पायऱ्यानी वर चढायला लागलो तर उजव्या बाजूला विहिरीवजा आकार दिसला. त्यावर चढून गेलो तर विहीर नव्हती. एकतर तो बुरुज असावा किंवा विहीर बुजून टाकली असावी. बुरुज असा मध्येच नसतो आणि तटबंदी अजून दूर होती. तिथे पहाऱ्याची चौकी होती जी सरळ खालून येणाऱ्या मार्गावर नजर ठेवू शकत होती. उर्जाला त्या चौकीची गंमत दाखवली आणि पुन्हा वर निघालो. वर नजर टाकली कि दगडादगडांची रासच दिसायची.वेळेत आवरायचे म्हणून आम्ही धावतच वर निघालो होतो. त्यात हवेत दमटपणा आणि उकाडा! त्यामुळॆ चांगलाच दम  लागायला लागला. त्यात घामाने भिजून निघालो. मध्येच थांबून श्वास घेताना समोर पहिले तर समूहातले दोन किल्ले दिसत होते. डाव्या बाजूला चंद्रयानदुर्ग आहे. हा आकाराने पसरट  आणि कमी उंचीचा दिसला आणि कृष्णगिरीच्या सरळ रेषेत एकदिड किमी आहे.  उजव्या बाजूला उंचच उंच टेकडीवर राजगिरी हा मुख्य किल्ला आहे. हा साधारण ८०० फूट उंचीवर आहे. त्याच्या आकारामुळे या बाजूने त्याचा आवाका कळत  नाही. पण मुख्य किल्ला असल्याने त्यावर धान्याची कोठारे,सातमजली महाल आणि इतर इमारती असे सर्व आहे. समोर हे दोन किल्ले आणि कृष्णगिरीच्या एकदम डाव्या पायथ्याशी जिंजी गाव पसरलेले आहे. हे सगळे डोळ्यात साठवत आम्ही पुन्हा वर चढू लागलो. आता पुन्हा कमान आणि मुख्य तटबंदी लागली जी अतिशय उत्तम स्थितीत होती. या मुख्य कमानीच्या वरच टेहेळणी चौकी आहे. आत जाताच डाव्या बाजूला धान्याची दोन कोठारे दिसतात आणि त्याकडे जाणाऱ्या कोरीव पायऱ्या आहेत. तर उजव्या बाजूने बालेकिल्ल्याकडे रास्ता जातो. त्याला पुन्हा एका कमानी दरवाज्याने आत जाता येते.

या कमानीच्या आतील बाजूस दगडी कलाकुसरीचे खांब असून दगडांना आकार देऊन पडदी बनवली आहे. समोर मोठ्या उंच चौथऱ्यावर एक इमारत दिसते. तीत वर चढून गेल्यावर ते एक मोठ्ठे सभागार असल्याचे लक्षात आले. छताला आधार देणाऱ्या दगडी खांबांना सुंदर नक्षीची सजावट दिसते तसेच विनम्र मुद्रेत मानवाकृती कोरलेल्या आहेत. या सभागारातून एक जिना डाव्या बाजूने वर जातो. तिथे दक्षिणी पद्धतीने बाजूने मंडप आणि मध्यभागी मंदिर आहे. मंदिराची बाहेरून पडझड झालेली दिसते. हे बहुदा नंतरच्या कालावधीत बांधलेले असावे. कारण बराचसा भाग दगडी नाही. मुळातच या समूहातील सगळेच बांधकाम वेगवेगळ्या काळातील आहे. नवव्या शतकापासून पुढे अगदी अठराव्या शतकातही काही बांधकाम झाले आहे. सुरवातीला चोला सम्राटांनी बांधकाम केलेल्या किल्ल्यात पुढे विजयनगर साम्राज्याचा भाग झाल्यावर अनेक सुधारणा केल्या. नंतर पुढील  घराण्याच्या ताब्यात आल्यावरही प्रत्येक घराण्यांनी किल्ल्याला अधिक भक्कम तर बनविलेच, सोबत नागरी सुधारणाही केलेल्या दिसतात.या मंदिराच्या परिसरातून दोन्ही कोठारे आणि पलीकडच्या राजगिरी किल्ल्याचे विहंगम दर्शन होते.

बालेकिल्ल्यातील सभागाराच्या मागे अधिक उंचीवर एक सुंदर इमारत दिसते. अगदी खालच्या मुख्य रस्त्यावरूनही तिच्या शिखराचे दर्शन घडते आणि म्हणूनच हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. याचे बांधकामही नंतरच्या काळातले वाटते. कमानीच्या आणि घुमत पाहता यावर मुस्लिम वास्तुशैलीचा प्रभाव वाटतो.
वेळेच्या अभावाने आम्ही या इमारतीच्या आत गेलो नाही.  इतकेच पाहू म्हणता म्हणता प्रत्येक इमारत खुणावत गेली आणि आधीच तासभर वेळ आम्ही घालवला होता.

महाराष्ट्राच्या आणि   महाराजांच्या इतिहासात या किल्ल्याचे महत्व आहेच. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी १६७७ मध्ये हा किल्ला घेतला. पुढेही मराठा सरदारांनी तो इतर आक्रमकांच्या हाती लागू दिला नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती झालेल्या राजारामराजेंनी मुघलांच्या सततच्या आक्रमणामुळे राजधानी रायगडावरून जिंजी येथे हलवली आणि ११ वर्षे तिथूनच कारभार केला. मुघलांनी ७ वर्षे जिंजीचा किल्ला घेण्यासाठी खर्ची घातली आणि अखेर राजारामराजेंनी तिथून काढता पाय घेतला आणि विशालगडमार्गे सातारा इथे पोहचून तिथून कारभार करायला सुरवात केली.

अश्या या किल्ल्याला अगदी अनपेक्षितपणे सर करता आले परंतु वेळेअभावी राजगिरीवर नाही जाता आले. खाली उतरेपर्यंत दीड  वाजत आला होता आणि जिंजीपर्यंत चांगला असणारा रस्ता  पुढे खराब झाला. त्यामुळे आम्हाला बंगलोर गाठेपर्यंत चांगले साडेसात वाजले. बंगलोरच्या ट्रॅफिकमुळे तर विमानतळावर वेळेवर पोचतो कि नाही अशी स्थिती झाली होती. पण नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणी आम्ही पोचलो. जर फ्लाईट चुकली असती तर शिव्या मलाच खाव्या लागल्या असत्या पण माझा बचाव त्यासाठीही तयार होता. महाराजांच्या किल्ल्यासाठी इतकी क्षुल्लक किंमत मोजायला मी तयार होतो. ( अर्थात जन्मभर टोमणे खावे लागले असते तर काही खैर नव्हती )

चित्र १. कृष्णगिरीच्या वाटेवर


चित्र २. पहिला कमानी दरवाजा

चित्र ३. पहिल्या तटबंदीच्या आतील चौकी  


चित्र ४.  पहिल्या कमानीच्या वरून दिसणारा राजगिरी 


चित्र ५. बालेकिल्ल्याची तटबंदी  


चित्र ६. बालेकिल्ल्याच्या आत 


चित्र ७. बालेकिल्ल्याच्या कमानीवरची चौकी  


चित्र ८. समोर दिसणारा चांद्रयानदुर्ग आणि खाली दोघांना जोडणारी तटबंदी 


चित्र ९. बालेकिल्ल्याच्या आतील इमारत  


चित्र १०. धान्याची कोठारे   


चित्र ११. सभागृह    


चित्र १२. मंदीर     


चित्र १३. मंदीराबाहेरचा दगडी  मंडप      


चित्र १४. दगडी  मंडपाचे खांब       


चित्र १५. पायथ्याचे तळे आणि पहिली कमान चित्र १६. पायथ्याचे तळे आणि राजगिरी 


चित्र १७. कमानीच्या आतील भागातील दगडी काम   चित्र १८. बालेकिल्ल्यात ( सभागृहाचा उंच चौथरा व इमारत आणि मागे  दरबाराची जागा)

चित्र १९. कृष्णगिरीवरून दिसणारा उजवीकडचा मुख्य राजगिरी आणि डावीकडचा चांद्रायन गिरी 
।। इति अस्माकं भाईगिरी ।।No comments: