Saturday, April 15, 2006

गोव्यातून बावड्याला जायचं म्हणजे सावंतवाडी-कणकवली-तळेरे असा मार्ग आहे.तळेरे पर्यंत हा मुंबई महामार्ग असल्याने खूप दिवसांपासून विसरून गेलेलं सुसाटणं मला आज अनुभवायचं होतं.हाताशी ऍव्हेंजर असल्याने बांदा येईपर्यंत अगदी सुसाट सुटलो.सावंतवाडीच्या अलीकडे इन्सुलीचा घाट लागतो.हा आमच्या प्रवासातला पहिला घाट! यातच गाडीची क्षमता कळून चुकली.मग काय ८०-९० चा वेग म्हणजे अगदी गल्लित असल्याप्रमाणे गाठला!हा घाट चढताच हवेत उष्मा जाणवू लागला.सावंतवाडीला पोचलो तोच गावात वळण्याच्या इराद्याने. पण मामांनी आठवण करून दिली की आता योगेश(माझा मित्र)ही तिथे रहात नाही.अगदी खट्टू होऊन मोतितलावाच्या काठाने चालू लागलो.सहा-साडेसहाची वेळ असल्याने वाडीकर फ़ेरफ़टक्याला निघालेले.तलावाला तसंच मागे सोडून जाववेना.मग काठाशी असणार्या पॉम्पस या रेस्टॉरंटमध्ये जरा कॉफ़िपान उरकण्यासाठी थांबलो.नजरेच्या एका टप्प्यात येणारा मोतितलाव पाहतांना कितितरी आठवणी जाग्या झाल्या.माझ्यासाठी सावंतवाडी म्हणजेच मोतितलाव,असा अर्थ आहे.तलावाभोवताली पसरलेला वाडीचा विस्तार,त्याला मर्यादित करणारे डोंगर,त्यातलाच एक नरेंद्र डोंगर,त्याच्या शिखरावर जातांना लागणारं अरण्य,शिखरावरून दिसणारं टुमदार सावंतवाडी आणि तलावाकाठी सूर्यास्ताच्या जोडीने केलेल्या गप्पा..... एवढं सगळं किती क्षणांत समोर यावं? मनाला मर्यादा नसतात हे मात्र खरं!परत यायला कधी जमेल माहीत नाही.अगदी निःशब्दतेने पुढचं मार्गक्रमण सुरू झालं.आपसूकच वेग कमी झाला.एव्हाना सूर्यास्त झाल्याने जड वाहानांनी रस्त्याचा ताबा घ्यायला सुरवात केली होती.त्यांचे हेडलाईट अगदी वैताग आणतात.त्यातच कोकणातले रस्ते अगदी वळणावळणांचे!आमचं पहिलं लक्ष्य होतं नापणे येथिल बारमाही धबधबा.त्यामुळे गगनबावड्याला सरळ न जाता रात्री कणकवलीतच मुक्काम ठोकायचं ठरलं.कण्कवलीच्या अलीकडेच एक चांगलसं हॉटेल पाहून तिथे उतरायचं ठरलं.जेऊन झाल्यावर एक फ़ेरफ़टका मारला.तिथेच एक शांत मंदीरात थोडा वेळ शांत बसलो.अविरत वाहणार्या रस्त्याकाठीही इतकी शांतता लाभू शकते.अंथरुणात पडताच झोप लागेल इतकं दमूनही झोप न लागणे याला काय म्हणावे?झोपेची आराधना करत असतांना केव्हातरी उशीरा झोप लागली.

Wednesday, April 12, 2006

गोव्याला जायचं काही निश्चित होत नव्हतं,पण जायचं मनात अगदी पक्कं होतं.मागच्या आठवड्यात दोन आणि या आठवड्यातल्या दोन मिळून चार दिवस सुट्टी मिळाली.माझ्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत मी जाणार की नाही हे मलाच माहीत नव्हतं.काही अडचण न येता मी उधळलो ते थेट गोव्यातच धडकलो.निघतांना गोव्यातल्या एप्रिलच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल हे अगदी ठरवून गेलो.मनात कोणतेच plan न ठरवता तिथे गेल्याने इडूकल्या (चिमण्या इडल्या)हादडून सकाळी जो झोपलो तो अकरा वाजेलाच उठलो.अति झोपेने अंगात जडपणा येतो तसा आलेला.त्याची मजा लूटत गॆलरीत आलो तर अनपेक्षितपणे गार वारा सुटलेला.खरं तर या काळात सगळ्या कोकणपट्टिचं रुपांतर भट्टीत झालेलं असतं.इथे उकाडा असतो तर खान्देश-विदर्भात उष्णता असते.पण हवेचं हे सुखद रुप अजूनच सुखावून गेलं.सगळा जडपणा आपोआपच गळून गेला.वार्याबरोबर काजूच्या बहराचा गंध आणि जवळच असलेल्या कढीपत्त्यांच्या झुडूपांचा गंध एक वेगळीच रेसिपि तयार करत होता.आता वारा कसाही असला तरी पुढचे चार दिवस अगदी मजेत जाणार हे नीटच उमगलं.विचार होता की दिनेशमामांच्याकडची जमतिल तितकी पुस्तकं आणि सिनेमे खाऊन टाकायचे. सोबतिला त्यांनी बनविलेले अजब पण तितक्याच स्वादिष्ट चवीचे विविध पदार्थ असणार होते.उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे यासारखा स्वर्ग नाही!आणि हवे ते लाड पुरवून घेणे यासारखे सुख नाही!दुपारी बरोब्बर १२.३० ला मामा आलेच आणि भरलेल्या भेंड्या,बटाट्याची भाजी,बिनतेलाचं लिम्बू-मिरची लोणचं,मिर्यांचं लोणचं अश्या अनोख्या पदार्थांवर भरपूर ताव मारला.आपण गगनबावड्याला जाऊत असं जेवतांनाच त्यांनी सांगितलं.मध्ये नापणे गावात बारमाही वाहणारा धबधबा बघयचा मग करूळ म्हणजेच गगनबावड्याच्या घाटातून वर जाऊन गगनगिरी महाराजांचा आश्रम पहावा असे ठरले.जमल्यास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच राजापूरलाही जाऊन यायचे असा बेत ठरला. पण जायचं कसं हे काही ठरत नव्हतं.बसने जायचं तर त्यांच्या वेळा पाळायच्या,त्याप्रमणे झोपायचं आणि उठायचं आणि भटकायचं. हे काही माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं. दुसरा पर्याय दुचाकी भाड्याने घेऊन मनमुराद भटकणे,पण एकूण अंतर पाहता चांगली दुचाकी असेल तरच हा प्रयोग राबवायचा असे ठरले.पाच वाजता पणजी पोस्ट ऒफ़िसजवळ एकाशी घासाघीस करत दुचाकी भाड्याने घेतली.मला हवी तीच म्हणजे दूरच्या प्रवासात आरामदायक ठरेल अशी बजाज अव्हेंजर मिळाली,त्यामुळे माझ्या उधळण्याला मर्यादा पडणे शक्य नव्हते.आता थेट गगनबावडा गाठायच्या इराद्याने vrooom.. vroooooom... suuuuuuuuuuu...

Friday, March 31, 2006



आणि ही बहरलेली सावरी!



मी आणि माझ्या आवडीच्या तिन्ही गोष्टी: टेलिफोन एक्स्चेन्ज,टॊवर आणि सावरी!:)

Thursday, March 30, 2006

मन बावरी सावरी.

गोव्यातले एप्रिलमधले दिवस! भरपूर उन्हाळा, चिक्कार घाम,जीवाची घालमेल! असं सगळं वातावरण आणि मग एक सुट्टीचा दिवस! अहाहा! सुट्टीचा दिवस म्हटला की मला ्सकाळी लवकरच जाग यायची.सहालाच फटफटीत उजाडलेलं असायचं. मग मी सहज फेरफटका मारायला बाहेर पडायचो.सुटीच्या दिवशीच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमधल्या निर्मनुष्य रस्त्यांवरुन अगदी रमतगमत जातांना निरभ्र आकाशातल्या उंचावर उडणार्या पक्ष्यासारखं वाटायचं.जवळच असलेल्या आजोबा देवस्थानाच्या पायरीवर थोडावेळ बसायचं, मग अगदीच अलगद पुढे जात माझ्या घरामागच्या नदीच्या किनारी जायचं.तिथे नारळींची बरीच गर्दी आहे.त्याच्या अलिकडे बरीच मोकळी जागा आहे. त्यात मला आवडणारी दोन झाडं आहेत, पण एकमेकांपासून दुरावा राखूनच.दोघांचही वागणं सारखंच पण स्वभाव भिन्न! पहिला आहे चाफा आणि दुसरी सावरी किंवा काटेसावर.दोघही जेव्हा फुलून येतात तेव्हा सगळी पानं झाडून टाकतात.चाफा मी पूर्वीही पाहिला होता. पण गोव्याला आलो तेव्हा प्रथमच मी सावरी पाहिली.अश्याच एप्रिलमध्ये लालेलाल फुलून आलेली सावरी! चाफा कसा वेडावून टाकतो सुगंधाने.एकतरी फूल उचलावेसे वाटणारच.

नारळीच्या गर्दीमध्ये
उभा चाफा एक निष्पर्ण
मोही सुगंधाचा धनी
आणि संन्याशाचा थाट.

पण सावरीची गोष्टच न्यारी.तिच्या काहीश्या मोठ्या आकाराच्या लाल फुलांना सुगंध असा नसतोच.आकारही आकर्षक नाही.जमिनीवर पडली तर टप्प असा आवाज होतोच,इतकी वजनदार फुलं! बरं दिसायला झाड खूप आकर्षकही नाही,पंधरावीस फूटांपर्यंत वाढणार्या झाडाला बुंध्यापासूनच काटे असतात.तरीही मला सावरी खूपच आवडते.सावरीचं सौंदर्यच आगळं आहे.मार्चच्या आसपास फूलं फुलायला सुरवात होते आणि तोपर्यंत पानं झडून गेलेली असतात.एकूणच गोव्यात कितीतरी सावरीची झाडं आहेत.एकाच काळात सगळी बहरून येतात.हिरव्या पानांचा अभाव असल्याने लालसर गुलाबी रंगांनी सावरी उठून दिसते.लवकरच फळं धरायला लागतात. फूलं आणि नुकतीच उमललेली चैत्रपालवी ल्येवून सावरी काय दिसते म्हणून सांगू! स्वतःच पहायला हवा तो नज़ारा! नुकतिच वयात आलेली सावरी! सोसाट्याचा वारा आला की टपटप करुन फूलं गळू लागतात.मला आठवते ती सावरी चाफ्यापासून अंतर राखून उभी असलेली :

पाने गाळुन तशीच
दूर एकट सावरी
लालेलाल फुलू आली
आणि वाराही मोकाट.

चैत्रपालवी येऊ लागते आणि फूलं गळून हिरवी कोवळी फळं दिसू लागतात.हळूहळू फळं पिकून काळपट होतात. आणि मग उन्हाळ्याच्या भर मध्यावर तिचं मला वेडावुन टाकणारं रुप दिसु लागतं.
ही फळं म्हणजे शेंगाच असतात बोटभर लांबीच्या आणि दोन बोटभर जाडीच्या.पिकलेल्या शेंगामध्ये कापूस भरून असतो.आता सावरीला झुळूकही सहन होत नाही.तटतट करत शेंगा अलगद फुटतात आणि ्जुन्या आठवणींनी येणार्या अश्रूंसारखा कापूस बाहेर पडतो. सावरीचं हे रुप मला वाटत्ं एखाद्या विरहिणीसारखं! नदीच्या किनार्यावर एकटीच उभी असलेली सावरी जणु आपल्या दूरवर गेलेल्या प्रियकराची वाट पहात असते.अगदी वेड्यासारखी ही प्रतीक्षा! कुणाची पर्वा नसते पण लोकांचे वर्मी लागणारे बोल असतात. तश्याच मधूनमधून येणार्या उष्ण झुळकांनी सावरी दुखावली जाते.प्रियकारच्या एकेक आठवणि याव्यात तसे एकेक फळं उमलु लागतात आणि प्रत्येक आठवणिने व्याकूळ होत अश्रू यावेत तसा गोलाकार कापूस बाहेर येतो.आणि पुन्हा एकामागोमाग आठवणि येत रहाव्यात,एकीत दुसरीचं बीज असाव्ं तसंच प्रत्येक गोलाकार कापसांच्या बरोब्बर मधोमध काळपट बीज आहेच.पुन्हा एका नव्या सावरीला जन्म देण्यासाठी!
नदीकाठच्या सावरीला आणि चाफ्याला न्याहळत मी पुन्हा घरी परतायचो.तेव्हा अंगणातच असलेली सावरी वाट पहात असल्यासारखी वाटायची.ही सावरी माझ्या आवडत्या Tower ला अगदी लागूनच उभी आहे.अशी सावरी अंगचटीला येऊ देत नाही कारण तिचे काटे! पण tower वर चढून सावरीची फळं बोटाच्या हलक्याश्या स्पर्शानेही उमलून जाताना पहायची हा माझा तसाच निवांत उद्योग! कोंडून ठेवलेली गुरं दार उघडताच जशी भरभर बाहेर येतात तसाच सावरीचा कापूस बाहेर येतो. तरीही त्याचा आकार अगदी गोलगोलच राहतो. वार्याने उडालेला कापूस मागे धावत गोळा करायचा आणि त्याची उशी करण्याचा मनसुबा घोळवत रहायचे.मी तसा खूप कापूस गोळा करून ठेवला होता पण त्याची उशी काही तयार झाली नाही.ते घर सोडतांना तो कापूस तसाच सोडून आलो. आताही सावरी तशीच फुलून आली असणार. तिचा कापूस गोळा करण्यासाठी पुन्हा जाईन म्हणतो.मला माहीत आहे,ती अजूनही तशीच वाट पहात बसलेली असणार,

डोळे लागले सागरी
कधी येशील किनारी
वाट पाहुनी थकेना
मन बावरी सावरी.