Wednesday, April 12, 2006

गोव्याला जायचं काही निश्चित होत नव्हतं,पण जायचं मनात अगदी पक्कं होतं.मागच्या आठवड्यात दोन आणि या आठवड्यातल्या दोन मिळून चार दिवस सुट्टी मिळाली.माझ्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत मी जाणार की नाही हे मलाच माहीत नव्हतं.काही अडचण न येता मी उधळलो ते थेट गोव्यातच धडकलो.निघतांना गोव्यातल्या एप्रिलच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल हे अगदी ठरवून गेलो.मनात कोणतेच plan न ठरवता तिथे गेल्याने इडूकल्या (चिमण्या इडल्या)हादडून सकाळी जो झोपलो तो अकरा वाजेलाच उठलो.अति झोपेने अंगात जडपणा येतो तसा आलेला.त्याची मजा लूटत गॆलरीत आलो तर अनपेक्षितपणे गार वारा सुटलेला.खरं तर या काळात सगळ्या कोकणपट्टिचं रुपांतर भट्टीत झालेलं असतं.इथे उकाडा असतो तर खान्देश-विदर्भात उष्णता असते.पण हवेचं हे सुखद रुप अजूनच सुखावून गेलं.सगळा जडपणा आपोआपच गळून गेला.वार्याबरोबर काजूच्या बहराचा गंध आणि जवळच असलेल्या कढीपत्त्यांच्या झुडूपांचा गंध एक वेगळीच रेसिपि तयार करत होता.आता वारा कसाही असला तरी पुढचे चार दिवस अगदी मजेत जाणार हे नीटच उमगलं.विचार होता की दिनेशमामांच्याकडची जमतिल तितकी पुस्तकं आणि सिनेमे खाऊन टाकायचे. सोबतिला त्यांनी बनविलेले अजब पण तितक्याच स्वादिष्ट चवीचे विविध पदार्थ असणार होते.उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे यासारखा स्वर्ग नाही!आणि हवे ते लाड पुरवून घेणे यासारखे सुख नाही!दुपारी बरोब्बर १२.३० ला मामा आलेच आणि भरलेल्या भेंड्या,बटाट्याची भाजी,बिनतेलाचं लिम्बू-मिरची लोणचं,मिर्यांचं लोणचं अश्या अनोख्या पदार्थांवर भरपूर ताव मारला.आपण गगनबावड्याला जाऊत असं जेवतांनाच त्यांनी सांगितलं.मध्ये नापणे गावात बारमाही वाहणारा धबधबा बघयचा मग करूळ म्हणजेच गगनबावड्याच्या घाटातून वर जाऊन गगनगिरी महाराजांचा आश्रम पहावा असे ठरले.जमल्यास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच राजापूरलाही जाऊन यायचे असा बेत ठरला. पण जायचं कसं हे काही ठरत नव्हतं.बसने जायचं तर त्यांच्या वेळा पाळायच्या,त्याप्रमणे झोपायचं आणि उठायचं आणि भटकायचं. हे काही माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं. दुसरा पर्याय दुचाकी भाड्याने घेऊन मनमुराद भटकणे,पण एकूण अंतर पाहता चांगली दुचाकी असेल तरच हा प्रयोग राबवायचा असे ठरले.पाच वाजता पणजी पोस्ट ऒफ़िसजवळ एकाशी घासाघीस करत दुचाकी भाड्याने घेतली.मला हवी तीच म्हणजे दूरच्या प्रवासात आरामदायक ठरेल अशी बजाज अव्हेंजर मिळाली,त्यामुळे माझ्या उधळण्याला मर्यादा पडणे शक्य नव्हते.आता थेट गगनबावडा गाठायच्या इराद्याने vrooom.. vroooooom... suuuuuuuuuuu...

3 comments:

Gayatri said...

नमस्कार गिरीराज! तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 'मायबोली' वरचं तुमचं लिखाण झकास असतं! आत्ताच तुमचा ब्लॉगदेखील पाहिला - अपेक्षेप्रमाणेच उत्तम आहे.

(btw, 'ब्लॉग', 'स्लॅमबुक', यांमधले ऑकार-ऍकार दाखवायला ~o आणि ~e हे shortcuts वापरता येतील.)

मग, कशी झाली बावड्याची ट्रिप?

गिरिराज said...

धन्यवाद,गायत्री!माझ्या आळसाशी लढतच लिहून पूर्ण होईल!त्यातच कालच्या treckबद्दलही लिहायचं आहे!

Shilpa said...

Khoopach sunder. Loved reading