Saturday, May 2, 2020

जसे नादती सूर सुखाचे,
दुःखाचीही किणकिण असते |
असेंच स्मरतां तुझे हासणे ,
सुखदुःखाची सीमा विरते ||

चुंबून घेता तुझी कुंतले,
ओठांवरती धुसफूस असते |
मजला ठावूक त्यांची खोडी,
मुळी कश्याची भ्रांत न उरते ||

कसे सोडवू या हृदयाला,
तुरुंग बटांचा, सहजी फसते |
कोण देश हा कसले जग हे ?
माझे मीपण मला न स्मरते ||

( जुनीच आहे, पहिल्या दोन ओळींसाठी रोहन विसपुते चे धन्स!!)

Sunday, December 9, 2018

जिंजीचा किल्ला

जिंजीचा किल्ला

पॉंडिचेरीच्या मुक्कामात महाबलीपूरमला  जाऊन  आलो  पण समुद्रकिनाऱ्यावर जायचे राहिले होते. ऊर्जाने हट्ट करून समुद्रावर जायचे पक्के करून घेतले. दुसऱ्या दिवशी आपण सूर्योदय पाहायला जाऊ अशी मीपण मेख मारून ठेवली. ठरल्याप्रमाणे आम्ही जेव्हा पॉंडिचेरीच्या समुद्रावर सकाळी सहाच्या आसपास पोचलो तेव्हा बरेच लोक मॉर्निंग वॉल्कला आणि असेच भटकायला पण आले होते. ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय दिसेल कि नाही हि शंका होतीच. प्रोमेनेड (Promenade) किनाऱ्यावर Le Cafe` नावाचे ऐक रेस्टराँ  आहे जे २४x ७ खुलेच असते.हे पॉंडिचेरी सरकारतर्फे चालवले जाते.  सकाळी तिथल्या टेरेसवर मस्तपैकी नास्ता आणि चहा कॉफी  असाही बेत होता. बराच वेळ सूर्योदय होत नाही म्हणून  आम्ही चालतच Le cafe` कडे निघालो. तिथे पोचलो तर कुणीच दिसेना. आत जायला लागलो तर एकाने तमिळमध्ये हटकले. शितलला कळलेच नाहीय आणि ती सरळ आत निघाली. आणि इकडे जो कर्मचारी होता तो तमिळमध्ये जास्तच भडकला. आमच्या बावळटपणाला पाहून दुसऱ्याने आमची इंग्रजीत सुटका केली. त्या दिवशी पॉंडिचेरी शासनाच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्याने Le Cafe` बंद होते. प्रोमेनेड किनारा  हा वाळूचा किनारा नाही. मोठमोठ्या शिळा टाकून किनाऱ्याची झीज थांबवण्याच्या प्रयत्नात सगळी वाळू नष्ट झाली आहे.काही  काही ठिकाणी २०-२५ मीटरचा भाग वाळूचा आहे. तिथे जाऊन ऊर्जाने समुद्रात भिजून घेतले. मलाही पाण्यात येण्याचा आग्रह केला मग मी हो नाही करत भिजलो. ऊर्जाने विचारले की मी स्वतःच पाण्यात का नाही येत. प्रत्येक वेळी मला आग्रह करावा लागतो. शेवटी तिला सांगितले की तू जशी आपोआप पाण्याकडे वळते तसा मी डोंगराकडे नाहीतर किल्ल्याकडे वळतो. हे सांगताना इथे तामिळनाडूमध्ये किल्ला भेटेल असे काही वाटले नव्हते.

समुद्राचा सोपस्कार झाल्यावर आमचा पॉंडिचेरीचा मुक्काम संपला होता. परत हॉटेलवर येऊन साडेनऊपर्यंत बंगलोरला परत निघायचे होते. तसे आम्ही वेळेत निघालो. रस्तायत पुन्हा एकदा आणि बहुदा शेवटचा तामिळ पद्धतीचा नाश्ता झाला. खरंतर उर्जाला डोसा आवडतो पण इथल्या मुक्कामात डोश्याचा ओव्हरडोस किंवा ओव्हरडोसा झाल्यामुळे ऊर्जाने महिनाभर तरी आता डोश्याचे नाव माझ्यासमोर काढू नका म्हणून ठणकावून सांगितले. नाश्ता होईतो अगदी मुसळधार पाऊस सुरु झाला.

रात्री सव्वानऊला परतीची फ्लाईट असल्याने आम्ही वेळेच्या खूप आधी पोहोचू असा अंदाज होता. आमच्या  ड्रॉयव्हरनेही तसेच सांगितले. पाऊस   असला तरी सहापदरी हायवेमुळे मजेत जाता येत होते. आजूबाजूला दूरवर गावे दिसत होती. पण रस्त्यात आपल्यासारखे ढाबे किंवा हॉटेल्स लागत नव्हती. मध्येच एक मोठे गाव किंवा तालुक्याचे ठिकाण लागले तर तिथे गुगलने सांगितलेला रस्ता बंद होता. वळून दूरवरून एका टेकडीला वळसा घालून निघालो. आता लहानमोठ्या टेकड्या दिसायला लागल्या होत्या. मोठमोठाले खडक सगळीकडेच दिसत होते. टेकड्याही आपल्यासारख्या एकसंध नसून दगडी शिळांचा ढीग लावल्यासारखा होत्या. थोडे पुढे आलो तर लांबून एका टेकडीवर किल्ल्यासदृश तटबंदी दिसत होती आणि पायथ्याशी मोठे गाव होते. अचानक पुढे पाटी लागली. गावाचे नाव लिहिले होते 'जिंजी'! एकदम इतिहास आठवला. शिवाजीमहाराजांच्या दक्षिण व्दिग्विजयात कुठेतरी जिंजी, तंजावर ई. उल्लेख आठवत होता. पण हे तेच असेल कि नाही शंका होती. कारण तमिळमध्ये गावाचे नाव 'सिंजी' आहे असे मंजुनाथ सारथ्याने सांगितले. इंग्रजी स्पेलिंग 'Gingee' असे होते. पुन्हा मंजुनाथ ला विचारले कि शिवाजीमहाराजांचा काही संबंध आहे का या गावाशी तर त्याने हो सांगितले. मग जरा कुतूहल वाढले. गाव ओलांडून गेल्यावर किल्ला असावा असे  दिसत होते.  ऊर्जालापण उत्सुकता होती महाराजांचा किल्ला बघण्याची. गाव ओलांडून एखाद  किलोमीटर गेलो तर उजव्या बाजूला पूर्ण टेकडी आणि किल्ला दिसू लागला. किल्ल्याची तटबंदी उत्तम स्थितीत होतीच पण वरचे इतर बांधकामही चांगल्या स्थितीत असल्याचे दिसले. डाव्या बाजूला अजून दोन उंच टेकड्या दिसत होत्या आणि त्यावरही काही बांधकाम दिसत होते. एका ठिकाणी उजव्या आणि डाव्या टेकडीवर जाण्यासाठी चांगल्या आणि मोठ्या पायवाटा दिसल्या. उजव्या बाजूचा किल्ला पहिल्यांदा दृष्टीस पडल्याने आम्ही तोच किल्ला आहे असे समजून चाललो होतो. त्यासोबतच या टेकडीचा आकार असा होता कि तटबंदी खालच्या उंचीवर होती आणि वरचे मंदीर, आणि इतर बांधकाम स्पष्ट दिसत होते. आता मात्र मला राहवले नाही आणि किमान पायथ्यापर्यंत तरी जाऊन येऊ असा विचार केला. मुख्य रस्त्यापासून पायथ्याचे अंतरही कमी नव्हते. पण वेळ आहे तर जाऊन बघू म्हणून मी आणि ऊर्जा निघालो. शीतलने गाडीतच आराम करायचा बेत पक्का केला. पुढे काय होईल याचा तिला बहुतेक अंदाज आला होता. आम्ही चालायला लागलो ती वाट मी आधी म्हटल्याप्रमाणे पायवाट नसून एका मोठ्या खंदकाच्या तटबंदीचा भाग होता. रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूच्या तीन टेकड्यांच्या किल्ल्याच्या  सुरक्षेचा हा भाग होता. मुळात जिंजीचा किल्ला एक नसून या तीन किल्ल्यांचा समूह आहे. पण नंतरच्या काळातआलेल्या  हायवेमुळे त्यांचा एकसंधपणा  जाणवत नव्हता.
पायथ्याशी आलो तर  Archaeological Survey of India अर्थातच पुरातत्व विभागाचा मोठा  बोर्ड होता आणि एक छोटेखानी ऑफिसही होते. वर जायचे तर २५ रुपयांचे तिकीट काढावे लागते. वर जावे कि न जावे या विचारात असताना पाहिले  तर  अर्ध्या उंचीपर्यंत दगडी पण कोरीव पायऱ्या दिसत होत्या. ऑफिसात विचारले कि वेळ लागतो वर जाऊन यायला तर माहिती मिळाली कि एका तासात याल परत! घड्याळात पाहून अंदाज घेतला तर विचार केला कि परत या वाटेवर आपण कधी येणार? आलोच आहोत तर जाऊन येऊ वर! अचानक भेटलेल्या महाराजांच्या किल्ल्याला असं टाळून पुढे जाणं  बरं दिसणार नाही! महाराज मजल दरमजल करत, एकेक गाव जिंकत इथपर्यंत आले होते. आणि आपल्याला फक्त एक तास देता येत नाही म्हणजे काय! उर्जाला  तर ट्रेक हवाच होता. शेवटी किल्ला सर  करायचा इरादा पक्का केला आणि तिकीट काढायला गेलो. मुलीचे तिकीट लागणार नाही पण मी भारतीय असल्याबद्दल त्याला शंका येत होती. परदेशी व्यक्तींसाठी तिकीटदर वेगळा होता. अजूनही माझ्याकडे पासपोर्ट नाही,मी भारताबाहेर कधी गेलो नाही आणि तो मला कुठल्या पद्धतीने अनिवासी समजत  होता ते त्याचा साहेब नाहीतर देवच  जाणे! शेवटी माझे BSNL चे ओळखपत्र दाखवले तर तो अगदी अगत्याने तिकीट देता झाला!

आम्ही वर जायला निघालो तो जिंजी समूहातील कृष्णगिरी किल्ला होता. याला राणीचा किल्ला म्हणतात. बहुदा राणीवसा या किल्ल्यात असावा. दगडी पायऱ्यांनी वर चढायला सुरवात केली कि लगेच दरवाजा लागतो पण याला बंद करता येईल असा दरवाजा नसून फक्तच कमान आहे. आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठीची जागा आहे. पुन्हा दगडी पायऱ्यानी वर चढायला लागलो तर उजव्या बाजूला विहिरीवजा आकार दिसला. त्यावर चढून गेलो तर विहीर नव्हती. एकतर तो बुरुज असावा किंवा विहीर बुजून टाकली असावी. बुरुज असा मध्येच नसतो आणि तटबंदी अजून दूर होती. तिथे पहाऱ्याची चौकी होती जी सरळ खालून येणाऱ्या मार्गावर नजर ठेवू शकत होती. उर्जाला त्या चौकीची गंमत दाखवली आणि पुन्हा वर निघालो. वर नजर टाकली कि दगडादगडांची रासच दिसायची.वेळेत आवरायचे म्हणून आम्ही धावतच वर निघालो होतो. त्यात हवेत दमटपणा आणि उकाडा! त्यामुळॆ चांगलाच दम  लागायला लागला. त्यात घामाने भिजून निघालो. मध्येच थांबून श्वास घेताना समोर पहिले तर समूहातले दोन किल्ले दिसत होते. डाव्या बाजूला चंद्रयानदुर्ग आहे. हा आकाराने पसरट  आणि कमी उंचीचा दिसला आणि कृष्णगिरीच्या सरळ रेषेत एकदिड किमी आहे.  उजव्या बाजूला उंचच उंच टेकडीवर राजगिरी हा मुख्य किल्ला आहे. हा साधारण ८०० फूट उंचीवर आहे. त्याच्या आकारामुळे या बाजूने त्याचा आवाका कळत  नाही. पण मुख्य किल्ला असल्याने त्यावर धान्याची कोठारे,सातमजली महाल आणि इतर इमारती असे सर्व आहे. समोर हे दोन किल्ले आणि कृष्णगिरीच्या एकदम डाव्या पायथ्याशी जिंजी गाव पसरलेले आहे. हे सगळे डोळ्यात साठवत आम्ही पुन्हा वर चढू लागलो. आता पुन्हा कमान आणि मुख्य तटबंदी लागली जी अतिशय उत्तम स्थितीत होती. या मुख्य कमानीच्या वरच टेहेळणी चौकी आहे. आत जाताच डाव्या बाजूला धान्याची दोन कोठारे दिसतात आणि त्याकडे जाणाऱ्या कोरीव पायऱ्या आहेत. तर उजव्या बाजूने बालेकिल्ल्याकडे रास्ता जातो. त्याला पुन्हा एका कमानी दरवाज्याने आत जाता येते.

या कमानीच्या आतील बाजूस दगडी कलाकुसरीचे खांब असून दगडांना आकार देऊन पडदी बनवली आहे. समोर मोठ्या उंच चौथऱ्यावर एक इमारत दिसते. तीत वर चढून गेल्यावर ते एक मोठ्ठे सभागार असल्याचे लक्षात आले. छताला आधार देणाऱ्या दगडी खांबांना सुंदर नक्षीची सजावट दिसते तसेच विनम्र मुद्रेत मानवाकृती कोरलेल्या आहेत. या सभागारातून एक जिना डाव्या बाजूने वर जातो. तिथे दक्षिणी पद्धतीने बाजूने मंडप आणि मध्यभागी मंदिर आहे. मंदिराची बाहेरून पडझड झालेली दिसते. हे बहुदा नंतरच्या कालावधीत बांधलेले असावे. कारण बराचसा भाग दगडी नाही. मुळातच या समूहातील सगळेच बांधकाम वेगवेगळ्या काळातील आहे. नवव्या शतकापासून पुढे अगदी अठराव्या शतकातही काही बांधकाम झाले आहे. सुरवातीला चोला सम्राटांनी बांधकाम केलेल्या किल्ल्यात पुढे विजयनगर साम्राज्याचा भाग झाल्यावर अनेक सुधारणा केल्या. नंतर पुढील  घराण्याच्या ताब्यात आल्यावरही प्रत्येक घराण्यांनी किल्ल्याला अधिक भक्कम तर बनविलेच, सोबत नागरी सुधारणाही केलेल्या दिसतात.या मंदिराच्या परिसरातून दोन्ही कोठारे आणि पलीकडच्या राजगिरी किल्ल्याचे विहंगम दर्शन होते.

बालेकिल्ल्यातील सभागाराच्या मागे अधिक उंचीवर एक सुंदर इमारत दिसते. अगदी खालच्या मुख्य रस्त्यावरूनही तिच्या शिखराचे दर्शन घडते आणि म्हणूनच हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. याचे बांधकामही नंतरच्या काळातले वाटते. कमानीच्या आणि घुमत पाहता यावर मुस्लिम वास्तुशैलीचा प्रभाव वाटतो.
वेळेच्या अभावाने आम्ही या इमारतीच्या आत गेलो नाही.  इतकेच पाहू म्हणता म्हणता प्रत्येक इमारत खुणावत गेली आणि आधीच तासभर वेळ आम्ही घालवला होता.

महाराष्ट्राच्या आणि   महाराजांच्या इतिहासात या किल्ल्याचे महत्व आहेच. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी १६७७ मध्ये हा किल्ला घेतला. पुढेही मराठा सरदारांनी तो इतर आक्रमकांच्या हाती लागू दिला नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती झालेल्या राजारामराजेंनी मुघलांच्या सततच्या आक्रमणामुळे राजधानी रायगडावरून जिंजी येथे हलवली आणि ११ वर्षे तिथूनच कारभार केला. मुघलांनी ७ वर्षे जिंजीचा किल्ला घेण्यासाठी खर्ची घातली आणि अखेर राजारामराजेंनी तिथून काढता पाय घेतला आणि विशालगडमार्गे सातारा इथे पोहचून तिथून कारभार करायला सुरवात केली.

अश्या या किल्ल्याला अगदी अनपेक्षितपणे सर करता आले परंतु वेळेअभावी राजगिरीवर नाही जाता आले. खाली उतरेपर्यंत दीड  वाजत आला होता आणि जिंजीपर्यंत चांगला असणारा रस्ता  पुढे खराब झाला. त्यामुळे आम्हाला बंगलोर गाठेपर्यंत चांगले साडेसात वाजले. बंगलोरच्या ट्रॅफिकमुळे तर विमानतळावर वेळेवर पोचतो कि नाही अशी स्थिती झाली होती. पण नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणी आम्ही पोचलो. जर फ्लाईट चुकली असती तर शिव्या मलाच खाव्या लागल्या असत्या पण माझा बचाव त्यासाठीही तयार होता. महाराजांच्या किल्ल्यासाठी इतकी क्षुल्लक किंमत मोजायला मी तयार होतो. ( अर्थात जन्मभर टोमणे खावे लागले असते तर काही खैर नव्हती )

चित्र १. कृष्णगिरीच्या वाटेवर


चित्र २. पहिला कमानी दरवाजा

चित्र ३. पहिल्या तटबंदीच्या आतील चौकी  


चित्र ४.  पहिल्या कमानीच्या वरून दिसणारा राजगिरी 


चित्र ५. बालेकिल्ल्याची तटबंदी  


चित्र ६. बालेकिल्ल्याच्या आत 


चित्र ७. बालेकिल्ल्याच्या कमानीवरची चौकी  


चित्र ८. समोर दिसणारा चांद्रयानदुर्ग आणि खाली दोघांना जोडणारी तटबंदी 


चित्र ९. बालेकिल्ल्याच्या आतील इमारत  


चित्र १०. धान्याची कोठारे   


चित्र ११. सभागृह    


चित्र १२. मंदीर     


चित्र १३. मंदीराबाहेरचा दगडी  मंडप      


चित्र १४. दगडी  मंडपाचे खांब       


चित्र १५. पायथ्याचे तळे आणि पहिली कमान 



चित्र १६. पायथ्याचे तळे आणि राजगिरी 


चित्र १७. कमानीच्या आतील भागातील दगडी काम  



 चित्र १८. बालेकिल्ल्यात ( सभागृहाचा उंच चौथरा व इमारत आणि मागे  दरबाराची जागा)

चित्र १९. कृष्णगिरीवरून दिसणारा उजवीकडचा मुख्य राजगिरी आणि डावीकडचा चांद्रायन गिरी 




।। इति अस्माकं भाईगिरी ।।



Friday, September 23, 2011

खूप काळाने माझ्याच्ग ब्लोगात असेच डोकावून पाहिले तर मी काय काय लिहिले होते त्याने मलाच गम्मत वाटली. मागचे बरेच काही आठवले त्यानिमित्ताने! लिहिले पाहिजे असेच .. आपलेच जुने फोटो पाहिल्यावर जसे गालातल्या गालात हसू येते तसेच काहीसे वाटते जुने काय काय उघडून पाहतांना! पण त्यासाठी आळस सोडायला हवा! :)

परवा पोरीने भयानक धुमाकूळ घातला . आजीने माझे अश्रू का पुसले म्हणून जबरदस्त आदळआपट झाली. त्यामुळे आलेले अश्रू आरश्यात दाखवून अश्रू पुसलेच नाहीत असा पवित्रा घेऊन सुटका करून घेतली. त्यावरून आईने माझीच जुनी आठवण सांगितली. त्यावेळी मला दगडावरून वेचून पुन्हा अश्रू लावून द्यावे लागले होते म्हणे.

भूतकाळ असा सहजच समोर येतो.... गंमत वाटते अश्या वेळी!
आळस सोडायचा म्हणतोय सध्या!

Wednesday, August 27, 2008

कवितांच्या खो-खो मध्ये प्रियाने पाठीत धापाटा मारून खो घालावा तसे अगदी ’लिहिणार असशील तरच खो देते ’ म्हणत मला लिहिण्यास उद्युक्त केले आहे. आवडत्या कविताच लिहायच्या असल्याने आणि नियम क्र. ४ नुसार काही ’सपष्टीकरण’ द्यायची गरज नसल्याने जरा आलस बाजूला सारतोय. :)

१. माळ ओसरे

हिरव्या माळापुढे निळा गिरि

गिरवित काळी वळणे काही

छप्पर झाले लाल अधिकच

धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर

कांठावरती ढग थोडासा;

थोडासा पण तीच हेळणा:

पिवळा झाला फक्त कवडसा.

हिरव्या माळापुढे निळा गिरि

मावत नाही इतुका फिक्कट;

झुकत चालली पुढेंच टिटवी

माळ ओसरे मागे चौपट.

२. शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,

भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली

भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,

गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,

भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे

शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.

दोन्ही कविता: आरती प्रभू

संग्रह:जोगावा

आता खो कुणाला द्यावा बरे? हं... सापडली मिनोती :)

Monday, August 11, 2008

सलाम अभिनव बिंद्राला!!!

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच
बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर
कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे
बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक
सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.
श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी
प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू
किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या
अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने
पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू
झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू
लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!
आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले
होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही
कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न
करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक
मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा
वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना
तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!

Saturday, April 26, 2008

हसण्यांतली गंमत

हसण्याचे फायदे अनेक असतात म्हणे! मला एक फायदा व्यवस्थित आठवतो. तेव्हा मी आणि माझा एक मित्र डिप्लोमा कॉलेजात ‘मास्तरकी’ करायचो. आम्हा दोघांना हसण्याचा भारीच नाद असल्याने आणि आम्ही अगदी दणकून हसत असल्याने बरीच पब्लिक आमच्यापासून चार हात लांबच रहायची. ‘लेक्चरर’ पदाचा आणि हसण्याचा संबंध असू नये या तत्वाची बरीच लोक्स असतात तशीच ही पण होती! आमच्या संस्थेचे चेअरमन फारच ‘कडक’ प्रकारातले होते. त्यांना मिटींग घेण्याची भारीच हौस! महिना अखेरीस तर केव्हा मिटींगसाठी फर्मान निघेल याचा नेम नसायचा. बरं,वेळ ठरवून आणि विषयानुसार मिटींग हा प्रकार काही या चेअरमन साहेबांना मान्य नव्हता. पाचला मिटींग ठरवून सातपर्यंत वाट पहायला लावून मिटींग रद्द करण्यात तर चेअरमन साहेबांना स्वर्गसुख मिळत असे. राजकारणी शिक्षणसम्राट असल्याकारणाने त्यांच्या विद्यादानाच्या अनेकविध ‘सोसायट्या’ होत्या. शाळेत शिकवणारा असो की इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य असो,सगळे त्यांच्या लेखी ‘मास्तरच’! त्यामुळे मिटींगच्या खेळात विविध प्रकारचे मास्तर एकत्र आणले जात आणि चेअरमन साहेब सगळ्यांना फैलावर घेत. पगारवाढीच्या काळात तर साहेब अधिकच आक्रमक होत की जेणेकरुन मास्तरांनी आधीच बॅकफूटला खेळावे आणि दबूनच पगाराबद्दल बोलावे. खास शिव्या खाण्यासाठी त्यांनी एक दोन शिपाई ठेवले होते. मिटींग चालू व्हायच्या वेळेला सगळी मास्तरं जमल्यावर, काहीतरी खुसपट काढून या शिपायांची आई बहीण काढायची आणि मगच मिटींग सुरू करायची असा दंडक न चुकता पाळला जाई. त्यामुळे सगळ्या मास्तरांची अवस्था मेंढरासारखी होत असे. आम्ही काही दोनचार डोकी सोडली तर इतरांची नोकरी पणाला लागल्यासारखी असायची. त्यातच खास ग्रामीण ढंगातल्या शिव्या असायच्याच.

तर,अश्याच एका मिटींगला आम्हीही होतो. याआधी फक्त ऐकून माहीत असलेल्या मिटींगला जायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. माझ्या मित्राने दोन-तीन मिटींग खेळलेल्या असल्याने खूप करमणूक होते आणि दोन दिवस नंतर हसून पोट दुखते ,असे त्याने सांगितलेच होते. सगळे मास्तर एकदाचे केबिनमध्ये शिरले.आम्ही कोपऱ्यातली जागा पटकावली होतीच. एका शिपायाला काहीतरी कारणाने जोरजोरात झापणे सुरू झाले. यथावकाश त्याच्या आई बाप बहीण आणि इतर खानदानाचा जुजबी आणि नंतर नीटच उद्धार चेअरमन साहेबांनी सगळ्या मास्तरांसमोर केला. इकडे मी आणि माझा मित्र फुटण्याच्या बेतात आलेलो. हसणे दाबण्याचा पराकोटीचा प्रयत्न पाहून बाजूला गंभीरपणे बसलेल्या मास्तरांचा चेहरा जास्तच गंभीर झाला. तो प्रसंग कसबसा निभावून नेला. नंतर डी.एड. की तत्सम कॉलेजच्या हेडमास्तराला काही तरी विचारणा सुरू झाली. मग एका क्लार्कभाऊसाहेबांना बोलावले गेले. ते घाबरतच आत आले. चेअरमन साहेब अगदी ओसंडून वाहू लागले. आम्ही पुन्हा फुटायच्या बेतात आलो. साहेबांनी खास ठेवणीतली अहिराणी शिवी बाहेर काढली आणि आम्ही फुटलोच. आमच्या रांगेतले मास्तर गंभीर चेहरा करून ‘तो मी नव्हेच’ दाखवू लागले. त्यांना तशी गरज नव्हतीच कारण आम्ही अजूनही फिदीफिदी हसत होतो. चेअरमनने लक्ष आमच्यकडे वळवले. आम्ही कोण म्हणून विचारणा झाली. मग त्यांच्या ‘पिये’ ला खडसावून सांगितले की पुन्हा डिप्लोमाच्या मास्तरांना मिटिंगला बोलवायचे नाही. आम्ही तसेच बाहेर पडलो आणि दोन दिवस हसत राहिलो. आमच्या हास्यफुटीमुळे पुन्हा दोन वर्षात डिप्लोमाच्या मास्तरांना मिटींगला बोलावले गेले नाही.

हसण्याची गंमत अशीच असते. सभ्यतेच्या नियमांमुळे जेव्हाचं तेव्हाच हसता नाही आले तर नंतर राहून राहून ती गोष्ट आठवत राहते आणि हसू पिच्छा सोडत नाही. मला तर रात्री बेरात्री उठल्यावरही असे काही आठवून हसायला येत राहते. आता परवाचीच गंमत! पंधरा दिवस पायदुखीने बेजार झाल्यावर एका डॉक्टरला पकडले. त्यांनी एक्स-रे काढायला सांगितला. मणक्यातली गॅप कमी झाल्यामुळे हा त्रास होतो म्हणाले. मग कमरपट्टा दिला,विविध गोळ्या औषधे चालू झाली. वेदना तर असह्य होत्या. दुचाकीपासून ट्रेकिंगपर्यंत अनेक गोष्टींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे लोकांनी डॉकटर,वैद्य,वैदू सुचवले. मी फारच हवालदिल झालो. जन्मात आता नीट चालता येईल की नाही अशी शंकाही येऊन गेली. एका लग्नाला गेलो तर तिथे नाचावे की न नाचावे अश्या जीवनमरणाच्या संभ्रमात मी पडलो. ताल चालू झाला तसा प्रश्न लगेच सुटला म्हणा! पण एकूणच गरोदर बाईसारखी माझी स्थिती झाली आहे. फारच जपून सगळे करावे लागते. शेवटी एका प्रथितयश डॉक्टरांकडे गेलो. अगदी जडावल्या पायाने आणि अंतःकरणाने केबिनमध्ये गेलो. एक्स-रे पण जपून काढून त्यांच्या हातात दिला. उगीच त्याला धक्का लागून माझी हाडं खिळखिळी होतील अशी भीति वाटत होती. काय काय होते ते सांगितले. डॉक्टरांनी अगदी हलगर्जीपणाने तो एक्स-रे हातात घेतला आणि त्यावर एक बाण दाखवला होता तिथे निर्देश करून बोलण्याच्या बेतात आले. मी मन घट्ट करून जन्मभर बेल्ट लाववा लागेल पासून मणके बदलावे लागतिल पर्यंत ऐकण्याची तयारी ठेवली. चेहरा अधिकाधिक गंभीर केला. त्यांनी बाणाकडे बोट दाखवून सांगितले,” यात जे दाखवले आहे ना… ”… हलकासा पॉज आणि माझे मणकेपण कानात आले.. अगदी कुत्सितपणे एक्स-रे कडे पाहत त्यांनी वाक्य पुरे केले “ तसलं काहीही तुला झालेलं नाहिये”… मी फुटण्यापासून स्वतःला सावरले. त्यांचे पुढचे सल्ले आणि व्यायामाचे प्रकार ऐकतांना मला सारखं हसू दाबून ठेवावं लागत होतं.

अश्या दाबलेल्या हसण्याचा त्रास असा की तो प्रसंग सारखा डोळ्यासमोर येऊन पुन्हा पुन्हा हसू येत राहतं. एकट्याने असल्यावर काही नाही पण चार-चौघात असे काही आठवले तर खूपच पंचाईत होते. पुन्हा दाबले तर त्याची तीव्रता वाढतेच पण असे अनेकानेक प्रसंग उगीच आठवायला लागतात. यावर मी एक उपाय शोधला आहे. तो सगळा किस्सा एकदोघांना सांगितला की जरा हलके वाटायला लागते. तसाच वरचा प्रसंग मी एक दोघांना सांगून झाला. पण काही फायदा होईना. शेवटी इथे लिहून त्याचा प्रसार करावा आणि हसण्यातली गंमत तुम्हालाही सांगावी म्हणून…. खीखीखी!!!!

Tuesday, October 9, 2007

ऐसे चूप है.....





परवा सहज म्हणून म्युज़िक वर्ल्ड मध्ये फ़ेरफ़टका मारतांना एका सीडीवर नज़र गेली. पहिलेच गाणे नूरजहाँचे 'चाँदनी राते' होते.त्यापूर्वी ते रिमिक्स प्रकारात ऐकलेले होते. त्याचे मूळ गाणे मिळाले म्हणून आनंद झाला.बाकी गाणी ही गज़ल,गीत वगैरे प्रकारातली होती. नूरजहाँच्या बरोबरीने मखमली आवाज होते रुना लैला ,मल्लिका पुखराज आणि फ़रिदा खानम यांचे! बऱ्याचदा आपण एका गाण्यासाठी सीडी आणतो आणि दुसरे एखादे न ऐकलेले गाणेच मनात घर करून जाते. यावेळेसही तेच झाले. रूना लैला ची आपल्या ओळखितली गाणी म्हणजे 'दमा दम मस्त कलंदर' आणि घरौंदामधलं 'तुम्हे हो न हो'! 'तुम्हे हो न हो' मध्ये प्रेमाला नकार देतांनाच त्याचीच कबूली देणारी रुना लैला खूपच आवडली होती. दमादम मस्त कलंदर मध्ये भेटणाऱ्या रुना लैलापेक्षा ही घरौंदामधली रुना लैला जाम आवडली होती. यापेक्षा वेगळी गाणी मात्र मी ऐकली नव्हती. त्यामुळे यातली तिची ३-४ गाणी एका अर्थाने पर्वणी वाटली. मात्र ज्या गज़लेने मेजवानी घडवली ती म्हणजे 'ऐसे चूप है'.. अहमद फ़राजची ही गज़ल गज़ल म्हणून आवडलीच पण रुना लैलाच्या आवाजामुळे डब्बल मेजवानी घडल्याचा आनंद मिळाला.



आता मी हे सगळे शब्दांत सांगतोय म्हटल्यावर मर्यादा येणारच.. म्हणून इथे फ़क्त गज़लेचे शब्दच लिहू शकतो. प्रत्यक्षात मला भेटलात तरीपण माझ्या आवाजात मी काही ऐकवणे म्हणजे शिक्षाच राहील तुम्हाला! त्यापेक्षा शब्दांनाच गोड मानून घ्या.. :)








ऐसे चूप है के मंज़िल कडी हो जैसे

तेरा मिलना भी जुदाई की घडी हो जैसे

(या मतल्यानेच मी अडकलो म्हणाना! सानी मिसरा अगदी कयामत वाटला!)




मंज़िले दूर भी है मंज़िले नज़दिकभी है

अपने ही पांव मे ज़ंजीर पडी हो जैसे

(लक्ष्यापर्यंत पोचण्यात मलाच अडचणी इतक्या आहेत की काय सांगू!)



कितने नादान है तेरे भुलाने वाले के तुझे

याद करने के लिये उम्र पडी हो जैसे

(शेर-ए-हासिल म्हणावा असा हा शेर. यातल विरोधाभास चकित करतोच करतो! एका उत्तम शेराचं लक्षण म्हणून सहज देता यावा असा हा शेर!)

आज दिल खोल के रोये है तो यूं खुश है 'फ़राज़'

चंद लम्हो की ये राहत भी बडी हो जैसे

हीच गज़ल गुलाम अलीनीही गायली आहे. मी अजून ऐकले नाही त्यांचे वर्जन. पण विफ़लतेची जी भावना रुना लैलाच्या आवाजातून व्यक्त झाली आहे तशी मला नाही वाटत गुलाम अलींनी आणली असेल. पहिल्या प्रेमासारखीच बहुदा गाण्यांची प्रथम ऐकलेली वर्जन्स जास्त आवडत असावीत. :)

म्हणूनच म्हणतो,कधी तुम्हाला ऐकायला मिळाली ही गज़ल आणि आवडलीच तर माझी आठवण जरूर काढा!









Thursday, June 7, 2007

जनरल अरुण श्रीधर वैद्य

५ जून १९८४,३१ ऑक्टोबर १९८४,१० ऑगस्ट १९८६...... आठवतात का कुणाला या तारखा? कदाचित ३१ ऑक्टोबर आठवत असेल.पण हे तिन्ही दिवस एकमेकांशी जोडलेले आहेत. ५ जून १९८४.. भारतिय सेनेच्या इतिहासातिल सगळ्यांत वादग्रस्त ्मोहिम 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' याच दिवशी सुरु केली गेली.३१ ऑक्टोबर ला इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यांनीच सेनेला पंजाब ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते की ज्याची परिणति 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मध्ये झाली. १० ऑगस्ट १९८६ ला जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली.'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' मागील मुख्य सूत्रधार म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.

हे सगळे आठवायचे कारण की मी जिथे राहतो तिथून पाचच मिनिटांच्या अंतरावर जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या झाली ते ठिकाण आहे.आणि तिथे फक्त एक साधा फलक आहे जो त्या जागेचा इतिहास चार वाक्यात सांगून मोकळा होतो. अगदी बाजूलाच कुंपणाच्या भिंतिंमुळे तयार झालेला कोपरा असल्याने तिथे कचरा साचून राहतो. अश्या परिस्थितीत त्या जागेचे महत्व कुणाला माहीत असणे तसेअवघडच आहे. मी रोज येताजाता त्या फलकाकडे पाहून 'काय बरे असेल इथे?' असा विचार करत पुढे जात असे.पण एकदा आवर्जून दुचाकी थांबवून मी वाचून काढला तेव्हा कळले की हेच ते ठिकाण जिथे खलिस्तानवादी अतिरेक्यांनी आपला सूड घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्या जागेची साफ़सफ़ाई करण्यात आली आणि बांधकामाचे साहित्य येऊन पडले.आता तिथे अर्धवर्तुळाकार आकारात बांधकाम सुरु झालेय. लवकरच तिथे एक स्मारक आकाराला येईल असे दिसतेय.बहुदा १० ऑगस्ट या त्यांच्या स्मृतिदिनी तिथे एक भव्य स्मारक दिसेल.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार' बद्दल त्यांच्याकडे कोणतेच वैयक्तिक अथवा राजकिय कारण नव्हते. त्यामुळेच कर्तव्याप्रति घेतलेल्या निर्णयांचा मोबदला चुकवावा लागलेल्या जनरल अरुण श्रीधर वैद्य यांच्या उपेक्षित स्मारकाला योग्य न्याय मिळतोय असेच मला वाटतेय.'

लष्कराच्या हद्दीत कोणत्याही वस्तूचा,स्मारकाचा किंवा इमारतिचा फोटो घेणे म्हणजे मार खायला आमंत्रण असते हा माझा नेहेमीचा अनुभव आहे.अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी बोलून सुटका करुन घेतलिये मी खूपदा! त्यामुळे दुर्लक्षित स्मारकाचा फोटो काढणण्याचे धाडस केले नाही. आता नूतनिकरण केलेल्या स्मारकाचा जमल्यास फोटो काढिन म्हणतो! :)

Sunday, April 29, 2007

बहावा आणि दोन छोटुले...

दिनेश यांचे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=940700#POST940700 हे लिखाण वाचून बहावा आठवला. माझ्या जीवनात(??? हे हे हे! काहीही म्हणतात लोकं ना!!!) बहाव्याचा संदर्भे आला तो 'आला शिशिर संपत'या कवितेत.. त्यातला 'बहाव्याने जेथे तेथे सोनतोरण बांधिले' ले पहायला मला वयाची २४ वर्षे वाट पहावी लागली. भारत संचार निगमच्या नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बहाव्याचं पहिलं दर्शन झालं. तेव्हा ते सोनतोरण पाहूनही तो बहावा आहे हे लक्षात आलं नाही.त्यासाठी पुन्हा ३ वर्ष जावी लागली आणि दिनेशशी ओळख व्हावी लागली.गोव्यात असतांना सुटीच्या दिवशी ते माझ्या घरी आले की निरुद्द्येश्य अशी अगदी रमत गमत भटकंती व्हायची आमची! त्यात गप्पा मारतांना झाडा-पानांपासून तर लावणी-नाट्यसंगितापर्यंतच्या विषयांवर ते बोलत रहायचे आणि मी ऐकत रहायचो. अश्याच एका भटकंतित माझ्याच घरासमोर असलेला आणि मला आवडत असलेला तो वृक्ष बहावा आहे हे त्यांनीच सांगितलं. तेव्हा कुठे मला 'सोनतोरण' आणि कवितेचा संदर्भ लागला!! (येडच्यापच आहे ना मी! ) त्याच्या शेंगेतला गोड गरही त्यांनीच सांगितलं म्हणून खाऊन पाहिला तर खूप आवडला.

तर हा असा बहावा,त्यांच्या उपरनिर्देशित लेखामुळे पुन्हा आठवला! ( आता २ वर्षांनंतर!) माझ्या घराच्या बाजूलाच असलेल्या बंगल्यात अगदी फुलून आलेला दिसला.फ़ोटो काढायचाच असे ठरवून शनिवारी आत शिरलो.बंगल्यात मालक राहत नाहीत पण कधी मधी येत असतात त्यामुळे केअर टेकर कुटुंबे तिथेच आऊट-हाऊस मध्ये राहतात.त्यांना विचारायचं म्हणुन त्यांच्या घराजवळ जाऊन आवाज दिला तर त्या बाई आणि त्यांची दोन छोटुली बाहेर आली.मुलगा ६-७ वर्षांचा तर मुलगी ३-४ वर्षांची असावी.मी फ़ोटो काढू का म्हटले तर त्या थोड्या घाबरून 'कशाचे?का?काय करणार त्याचे?' म्हणून विचारू लागल्या. मी त्यांना सांगितले पण त्यांनी रिस्क न घेता सासूबाईंवर निर्णय टोलवला.मी सांगितले की बंगल्याचे फ़ोटो घेणार नाही फ़क्त झाडाचे घेईन आणि तुम्हाला दाखवीन मगच् तुम्ही म्हणाल तर सेव्ह करीन.आणि फ़ोटो काढण्यासाठी झाडाजवळ जाऊ लागलो.तर हा छोटा मुलगा आईच्या मदतीला धाऊन आला आणि जोरजोरात आजीला बोलावू लागला.वर मला म्हणतो की थांबा आजी म्हळाली तरच काढा म्हणून! मला त्याची गंमत वाटली.तितक्यात आजी बंगल्यातले काम ताकून बाहेर आल्या आणि त्यांनीही सूनबाइंप्रमाणेच प्रश्न विचारले.त्यांनाही उत्तरे दिली पण त्याही थोड्या साशंक दिसल्या.मीमुलाकडे पाहून याचेही फ़ोटो काढतो म्हटल्यावर पोराने आजी आणि आई दोघींना न जुमानता फ़ोटो काढा म्हणाला. काहिका असेना,मला फ़ोटो काढायला परवानगी देणारे 'छोटे सरकार' अगदी उत्साहात आले आणि बहीणीला चड्डी घालून ये म्हणून फ़र्मावले. झाडासोबत दोघांचे एक दोन फ़ोटो काढून लगेच त्यांना दाखवले तर त्या बाबाचा हट्टच सुरू झाला. एकामागून एक लोकेशन्स शोधून इथे फ़ोटो काढा,तिथे फ़ोटो काढा म्हणू लागला. एक फ़ोटो चिंचेच्या ढिगाऱ्याजवळ,दुसरा सायकलवर,तिसरा हसतांना,चवथा बोलत असतांना अजून एक कमरेवर हात ठेवून असे बरेच फ़ोटो काढावे लागले.मला कटायचे होते पण त्याचा उत्साह संपेना. वरून प्रत्येक फ़ोटो काढला की बहीणीला,आईला,आजीला दाखवावा लागे! शेवटी डोळे वटारून उद्या येतो परत म्हणून सांगितले तेव्हा स्वारी थोडी मऊ झाली!या सगळ्या प्रकारात बहाव्याचे (माझ्या दृष्टीने) चांगले फ़ोटो मिळालेच पण दोन येडच्याप पोरांशी ओळख झाली म्हणून खूपच आनंद झाला!त्या बंगल्यात भरपूर झाडं आहेत. आता एकेकाच्या बहराच्या काळात झाडांचे आणि पोरांचेही फ़ोटो काढत जाईन!

तर असे हे बहावा फ़ोटो पुराण दोघा छोट्यांच्या फ़ोटोने सुफ़ळ संपूर्ण!!! :)

Friday, January 19, 2007

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी आहे:

वेळ मिळेना कशाचसाठी
आठवत राही तिचेच हसणे
जाई सारा वेळ खरे तर
सोसत हसण्या आधीचे रुसणे!

Wednesday, December 20, 2006

यार ने कैसी रिहाई दी है....

एकच एक माणूस तुम्हाला कधी खूप वेगवेगळ्या रुपात भेटलंय का?मला माणूस नाही पण गुलज़ारचे एकाच गज़लेतले दोन शेर खूपदा वेगेवेगळ्या पद्धतिने आणि वेगवेगळ्या रुपात खूपदा भेटले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचा संदर्भ अगदी आसपासच्या उदाहरणाशी जोडून आला आणि अगदी थक्क व्हायला झालं;प्रत्येकदा!!

जिसकी आँखों मे कटी थी सदीयाँ
उसने सदीयों की जुदाई दी है!

एकाच शब्दाला फ़िरवून अर्थ बदलून टाकण्याची गुलज़ारची हातोटी यातही बघायला मिळते.कुणाची तरी वाट पहात रहावं आणि त्याने कधी येऊच नये... म्हणाल तर तो प्रियकर असेल,प्रेयसी असेल,विकासाचा किंवा आशेचा किरण असेल.... डोळ्यांत प्राण आणून वाट पहात रहावं.. वेळही कळू नये किती गेला या वाट पाहण्यांत आणि येणाऱ्याने येऊच नये.......
-----------------------------------------------------------------------------------------------

दुसरा शेर तर खूपदा भेटतो.. प्रत्येक वेळी हसून निघून जातो....

फ़िर वही लौट के जाना होगा,
यार ने कैसी रिहाई दी है....

बघा आठवून असे कित्येक प्रसंग असतिल... तेव्हा वाटतंच वाटतं..

यार ने कैसी रिहाई दी है......

Thursday, November 23, 2006

सध्या मला अगदी पोटभरुन कंटाळा आलाय.अश्या वेळी काहीही करायचे म्हटले तरी त्याचाही जाम कंटाळा येतो.पिक्चर बघायचाही कंटाळा येतो,पुस्तक वाचायचाही कंटाळा येतो;अगदी जेवायचाही कंटाळा येतो.पण आता घरी असल्याने जेवावे लागतेच.. नाहीतर आई तिची धमकी खरी करून दाखवू शकण्याची भीती असतेचे-माझ्यामुळे वाया जाणारा स्वयंपाक माझ्या डोक्याला चोपडून देईन म्हणते.... अश्या कंटाळ्यात काय करायचे म्हणुन मी खूप दिवसांपासून ढुंकूनही न पाहीलेला माझा हा blog लिहायचा प्रयत्न करतोय.मागच्या २ तासांत मी एक ओळ लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि ती तशीच अर्धवट सोडून इकडे वळलो.आता मला किमान आठवडाभर तरी सुटी घ्याविशी वाटतेय आणि मस्तपैकी दुचाकीवरून भटकावेसे वाटतेय.पण जर सुटी घेऊन घरी राहिलो तर मला घरातली अतिशय फ़ुटकळ काम मह्त्वाची म्हणुन मला करायला लावली जातील.त्यात लेटर बॉक्स भिंतीवर लावणे हे अतिशय अवघड कामही मला करावे लागू शकते.त्यापेक्षा सुटीमध्ये पळून जाणे किंवा सुटीच न घेणे हे उपाय आहेत.सध्या तरी सुटी न घेणे चालू आहे.पुढच्या महीन्यात पळून जाणे हा उपाय अंमलात आणता येतो का हे पहावे लागेल.सध्या पळून जाता येईल अशी (होणारी)बायकोही आहे.पण ती एक पात्र आहे.लग्न होणारच आहे तर पळून का जायचे म्हणते!मग एकटेच पळुन जावे लागेल असे वाटतेय.पण तरी एक अडचण आहेच.. आठवडाभर ती भेटली नाही तर कसे होईल अशी भीती वाटतेय.पण मला माहित आहे,एकदा मी निघालो की कही असे होणार नाही.पण सध्या मनात आहेच की ते!आता काय करायचं?

बरं! माझी टेन्शनं तुम्ही का म्हणुन घेतात... मला आता लिहायचा कंटाळा आलाय! तेव्हा भेटू पुन्हा.. तोपर्यंत... हरी हरी!

Wednesday, October 18, 2006

Sweet Romance


गाण्यांच्या बद्दल लिहायचं म्हटलं की शब्द आपसूकच मदतीला धावून येतात.पण ज्यात शब्दच नाहीत अश्या एखाद्या Instrumental Piece बद्दल काय लिहावे हेच सुचत नाही.आपल्या भारतात मुळातच संगित म्हटले की चित्रपटसंगित नजरेसमोर येतं.जर भारतिय शास्त्रिय संगिताबद्दल अगदीच अंधार असेल तर वाद्यसंगित कुठून माहीत होणार!काही वर्षांपूर्वी अगदीच नादावलेल्या वयात एकदा दुकानात असाच TP करत असतांना त्या वयाला भुलावणाऱ्या नावाची एक cassette दिसली. Sweet Romance! कव्हरवरच्या सुंदर प्रकाशचित्रानेही मन मोहून घेतलं!cassette उचलून पाहिली तर त्यातल्या sweet romance या एका गाण्याने एक आठवण जागवली.शेखर सुमनच्या Movers & Shakers या कार्यक्रमात पं.शिवकुमार शर्मा यांच्या मुलाची म्हणजेच राहुल शर्माची मुलाखत घेतली होती.कार्यक्रम संपताना त्याने ह्याच गाण्य्यातला(?) छोटासा भाग संतूरवर वाजवून दाखवला होता.अगदी captivating वाटला होता मला तर! लगेच cassette घेतली.अश्या खरेदीची गंमत अशी की मला लगेच ती ऐकायची असते. कपडे खरेदी असेल तर घरी जाताच ते वापरायचे असतात.कधी कधी तर मी दुकानातूनच असे कपडे,चपला तश्याच घालून निघतो.त्यावेळी माझ्याकडे एक डबडा टेप होता.पण त्यावरही काम भागत असे.टेपवर Reverse / Forward काम करत नसेच.दुसऱ्या ्बाजूच्या असलेले sweet romance ऐकण्यासाठी पूर्ण cassette हाताने forward करावी लागली.बी साईडला प्रथम येते ते 'मेला'! टिपिकल गावच्या जत्रेवरून कम्पोज़ केलेलं हे गाणं अगदीच ताल धरायला लावतं.मात्र मला नंतर काही कामामुळे थोडा वेळ बाहेर जावं लागलं.संध्याकाळी परत येताच पहिलं काम पुन्हा कॅसेट ऐकणं.धुळ्यासारख्या ठिकाणची हिवळ्यातली सरती संध्याकाळ!खूपच गारवा हवेत होता.मी दूध गरम करून त्यात मस्तपैकी नेसकॅफ़े टाकून पुन्हा टेप लावून बसलो.अश्या वेळी अगदी मंद प्रकाशात संगित ऐकायला मला जाम आवडतं.पुढचं कम्पोज़िशन होतं Remembering Her!याची सुरवात होते अतिशय विरही स्वराने.उगाच कुणाची तरी आठवण आल्यासारखं मलाही वाटू लागलं.आवाज जरा मोठा करून मी बाहेरच्या ओट्यावर येऊन बसलो.आजूबाजूला अगदीच शांतता होती.थंडीमुळे कुणी बाहेरही पडत नसतं.अश्या वातावरणात संतूरचे सूर अधिक आत घुसत गेले.एका आर्त नोटवर ते कम्पोज़िशन संपले.दोन ट्रॅकमधली रिकामी जागा खूप लांबली असल्यासारखी वाटू लागली.आणि अचानक त्याच संतूरचे अतिव आनंदी स्वर कानावर पडले.संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रिय माणसाची वाट पहात बसावं.माहीत असावं की ते माणुस येणार नाही.आणि अचानकच त्याचं येणं व्हावं.तीच भावना होते Sweet Romance हा ट्रॅक ऐकतांना.remembering her सारख्या उदास ट्रॅकनंतर आल्याने sweet romance अधिकच प्रभावी होते.संतूरचे स्वर खरं तर मला खूपच आवडतात.त्यात का कुणास ठावूक एक खूप मोकळेपणा वाटतो.सनई एका अर्थाने दुःखाचे प्रतिकात्मक स्वर घेऊन येते.त्याच्या अगदी उलट म्हणजे उत्कट आनंदाचे स्वर असणारे संतूर!(अर्थातच या माझ्या स्वतःच्या समजुति आहेत.)हा आनंद संयत असा नसतो तर अगदी नाचायला लावणारा आनंद!हिरव्यागार टेकडीवरच्या चढ-उतारांवरून पळापळ करत दमून जावे यातही एक आनंद असतो.अगदी तसेच वाटतात मला sweet romance चे स्वर! खरं तर हे नीट व्यक्तही करता येत नाही आणि शब्द नसल्याने त्याबद्दल लिहिताही येत नाही. पण खूप काही सांगावसं वाटतं.पण नाविलाज को क्या विलाज! तुम्ही ते ऐका स्वतःच!अल्ल्ड वयात तिच्या जवळपास असण्यानेही हुरळून जावे,तिच्या ओझरत्या नेत्रकटाक्षानेही हवेत उडायला लागावे,ती लाजली तर जीवच द्यावासा वाटावे,अचानक पाऊस यावा,तिने भिजत असता तिला आपल्या छत्रीत घ्यावे,तिचा ओझरता स्पर्श व्हावा,मग आपण उगाच तिच्या हाताला स्पर्श करावा,तिने लाजून चूर व्हावे आणि मग सारे जगच पावसात विरघळून गेल्यासारखे आपण दोघेच उरावे.. असाच हा पहिल्या प्रेमाचा स्पर्श.. A Sweet Romance!

Saturday, August 5, 2006

आये तुम याद मुझे...

काल किशोर कुमारचा जन्मदिवस होता.भारतिय हृदयाचा एक कोपरा कायम व्यापणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किशोर कुमार!'किशोर' इतकंच त्याला म्हणता येतं.उगीच कोणत्याही प्रकारचे आदरार्थी विशेषणं त्याला लावायची गरज नाही इतका किशोर आपला वाटतो.विविध दूरचित्रवाणि वाहिन्यांनी काल विविध कार्यक्रम सादर केलेच पण केक कापून जणू किशोर आजही आपल्यातच आहे असा उत्सव साजरा केला.आणि ते काही खोटंही नाही.आयुष्याच्या कोणत्याही वळणावर किशोरचं एखादं गीत आपली साथ करतच असतं.मग प्रसंग आनंदाचा असो,दुःखाचा असो किंवा कोणत्याही भावनेने अलिप्त असा असो.. किशोरचं गीत आठवतंच आपल्याला!पण आज मला आठवतंय त्याचंच एक गीत,'मिली' चित्रपटात अमिताभसाठी गायलेलं.. आये तुम याद मुझे.......

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन

काल सारखं हेच गीत का ओठी येत होतं कळेना.. अगदी जड आणि दर्दभऱ्या आवाजात किशोर गातो.. अमिताभ येरझऱ्या घालत गात असतांना दिसतो पडद्यावर.

जिसपल नैनों मे सपना तेरा आये
उसपल मौसम पर मेहन्दी रच जाये
और तू बन जाये जैसे दुल्हन

कवी योगेश यांची एक सुंदर कविता,साधी पण आशयगर्भ शब्दरचना आणि सचिनदेव बर्मन यांचे संगित; या सगळ्यांवर कळस म्हणजे किशोरचा आवाज़!

जब मै रातों मे तारे गिनता हूं
और तेरे कदमों की आहट सुनता हूं
लगे मुझे हर तारा ,तेरा दर्पण

सुरवातिला गोड आणि रोमॅन्टीक गाणीच किशोरच्या वाट्याला आली होति.पण पुढे जेव्हा अशी दर्दभरी गाणी त्याला मिळाली तेव्हा किशोर काय चीज़ आहे हे जगाला कळून चुकले.असंच एक 'मंज़िले अपनी जगह' किंवा 'मेरा जीवन कोरा कागज़' कायम गुणगुणायला लावणारं!

हरपल मन मेरा मुझसे कहता है
जिसकी धुन मे तू खोया रहता है
भर दे फूलोंसे उसका दामन

या गाण्यातल्या प्रत्येक कडव्याची सुरवात काहिश्या निराशेने होते.आणि मग तिसरी ओळ येते तेव्हा एका स्वप्नजगतात नेणारा आशावाद प्रतित होतो.'जब मै रातों मे..' म्हणतांनाचा किशोरचा आवाज आणि शेवटी 'लगे मुझे हर तारा,तेरा दर्पण' म्हणतांना प्रत्येक भावना जगणारा किशोरचा आवाज, जादूई आहे हेच पुन्हा प्रतित होते.गायनातले कोणत्याही प्रकारचे formal शिक्षण न घेतलेला किशोर हे जे करतो त्याला दैवी देणगीच म्हणावे लागेल.किशोरच्या आवाजातली जादू अनुभवायची असेल तर याराना चित्रपटातली दोन गाणी आवर्जून ऐकावीत.खरं तर दोन्ही गाणी पडद्यावर साकारली आहेत पुन्हा अमिताभनेच!पहिलं गीत आहे अतिशय हळूवार प्रेमगीत..."छूकर मेरे मनको"... यातला 'छूकर' कितीतरी हळूवारपणे स्पर्शून जातो.आणि हे गाणं संपत नाही तोच दुसरं गाणं सुरू होतं ते म्हणजे 'सारा ज़माना'! दोन्ही गाण्यांतला ज़मीन आसमानाचा फ़रक किशोरच्या आवाजातून किती अधोरेखित होतो!वाटतं,हळूवारपणे स्पर्शून जाणारा हाच का तो किशोर जो अगदी टपोरी ढंगात 'सारा ज़माना' म्हणतोय!

किशोरचा स्पर्श झालेली कितीतरी गाणी नुसति ऐकत रहावसं वाटतं.सहज आठवायचं म्हटलं तरी कितीतरी गाणी मनातून सरळ ओठांवर येतात.जादूच म्हणावी लागेल ही किशोरची!आज किशोर नसला तरी तितक्याच उत्साहात त्याचा जन्मदिन साजरा होतोय.पुढेही होतच राहील.पण त्याची आठवण देणारं हेच गीत पुन्हा त्याच्यासाठीच अर्पण...

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन!

Wednesday, June 21, 2006

मनी मायबोलि (माझी मातृभाषा)

(गायत्रिचा ब्लॉग वाचतांना लक्ष्यात आलं की ही बया विविध बोलिंत लिहित सुटलिय.तिने माझ्या मातृभाषेत लिहायच्या आधीच मी लिहिणं अगदी गरजेचं आहे :) )

आपला राज्याना उत्तरेकडना जिल्हा म्हन्जे धुये,नन्दुरबार,जयगांव आनि नाशिकना उत्तर भाग याले 'खान्देश' म्हन्तस.गंज (खूप) वरीस तठे (तिथे)मुसलमानी राजे लोकेस्नं राज्य व्हतं त्यानालागे (त्यामुळे) 'खान देस' असं नाव पडनं.आते या भागमा बोलतंस ती बोली म्हन्जे 'अहिराणी' खरं तं 'ऐरानी' बोली!
तिच मनी (माझी) मातृभाषा. माय बोलस ती 'मायबोली'! आमनि माय आन बाप येरायेर (एकमेकांशी)ऐरानीमाच बोलतंस आनि भांडतसबी!
मना (माझ्या) मायआजीले ते (तर) ऐरानी सोडता दुसरी भाषा येये न्हई. कानले ऐकाले गोड वाटस (वाटते) ऐरानी.खान्देस म्हन्जे त्याले गुजरात,मध्ये परदेस जोगे (जवळ)शे (आहे)!त्यानलागे ऐरानीमा मारवाडी,गुजराती आनि हिन्दीना बराच शब्दे येल शेतस.्वाक्यरचाना हिन्दिसारखी र्हास!कोन म्हनस जुना जमानामां ह्या भागवर 'अहिर' राजानं राज्य होतं.. त्यानालागे ह्या भासाले (भाषेला) 'अहिराणी' नाव पडनं.कोन म्हनस,'ह्या भागमां तव्हंय (तेव्हा) राह्येत त्या लोकेसले (लोकांना) 'अव्हेरी' (अव्हेरून) टाकेल व्हतं आन म्हनून त्यास्नी भाशा म्हन्जे 'अहिराणि' ! आते जे बी कारण व्हई ते व्हई.बठ्ठा लोके हाई भाषा बोलतंस हे नख्खी!गावम्हदार (गावांमध्ये) मराठी बोलनराले एक ते 'मास्तर' म्हनतंस न्हई ते 'दीडशहाना'!तुम्हले म्हाईतीच शे (आहे) बहिणबाई ह्या जयगांव जिल्हाना व्ह्यत्या.त्यास्न्या कविता ऐरानीम्हदारच शेतस! हा,यक शे,त्या भागमा ऐरानी जास्त मराठीसारखी र्हास.पन धुया भागमां बोलतंस ती पिव्वर ऐरानी!
आते (आता) मी ऐरानीम्हदार लिखानां संकल्प सोडेल शे,ते काय काय लिखसू याय (वेळ) जमीं तसा आन सुची तसं!

Monday, June 5, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदीयाळी...

रजनीगंधाने या खेळात Tag करायला एक महीना उलटून गेला आणि पुस्तकांच्याबद्दल लिहायचे सारखे राहून जातेय.असेच होते... एखाद्या गोष्टीबद्दल खूप काही बोलायसारखे असले की ऐनवेळि शब्दच अपुरे पडतात किंवा सुचतच नाहीत! अगदी सहजच आठवायची म्हतलिइ तरी कितीक पुस्तकं डोळ्यासमोर येऊन जातात.एकाबद्दल लिहायचं म्हटलं तर दुसरं नक्कीच रुसणार!काही पुस्तकं एखाद्या शिक्षकाप्रमाणे भेटली,खूप काही शिकवून-समजावून गेली.काही अगदी सवंगड्याप्रमणे गळ्यात हात टाकत आपली गंमत सांगत राहिली.काही वेड्यासारख्या कथा सांगता सांगता हसवून गेली तर काही करूण-काव्य सांगताना रडवून गेली!काहींनी युद्धाच्या कथा सांगतांना अंगातळं रक्त सळाळून गेलं तर कधी त्यातलीच करुणा वाचून मन हेलावून गेलं.प्रत्येकाची वेगळी शैली,प्रत्येकाची वेगळी कथा आणि वेगळी तऱ्हा!
म्हणूनच एकाबद्दल लिहितांना दुसऱ्याला राग येणार तर नाही ना अशी भीती वाटते.पण नाही येणार त्यांना राग तसा.. आणि आलाच तर आपल्याच माणसाच्या रागाचे काय ईतके? एक हाक मारली तर गाल फ़ुगवून जवळ येतील आणि पुन्हा तोच प्रेमसंवाद चालू होईल.. तर.......

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
मी एका वेळी दोन तरी पुस्तके वाचत असतो त्यामुळे...
माणूस आणि झाड ले. निळू दामले आणि अवघाची शेजार- राणी दुर्वे

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
इथे एकाबद्दलच लिहितो:माणूस आणि झाड:जेमतेम नव्वद पानांचं हे पुस्तक.. मुखपृष्टापासुन मनात ठसतं.आपण पुस्तकात काय वाचणार आहोत हे सांगणारं इतकं सुन्दर मुखपृष्ट मला तरी दुसरं आठवत नाहिये सध्या!लहानपणापासून आपण इतकी झाडं पाहतो की ्त्यांच्याविषयी वेगळा विचार कधी होतच नाही.आई,बाबा,भावंड यांच्याविषयी आपण जितके आश्वासक असतो तितकेच या झाडांबद्दलही! त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याविशयी गप्पा मारायच्या राहूनच जातात! निळू दामलेंनी या सृष्टीची आपल्याला असलेली ओळख अधिक दृढ करून दिलीय या पुस्तकाद्वारे!इतकी की आपल्या गप्पा अजून रंगतील आता झाडांसोबतच्या!कुठेही काही वैज्ञानिक सिद्धांत माडतोय असला अभिनिवेष नाही की कठीण शब्दांचा अडसर नाही.झाडांबरोबरच्या आपल्या नात्याप्रमाणेच अगदी साधी सरळ ओघवती भाषा!एकाका मित्राची ओळख करून दिल्याप्रमाणे एकेका भागाचं सुंदर वर्णन आणि अलगद त्याच्या अंतरंगात डोकावणे.. इतकी सुंदर त्यांची भाषाशैली आहे.मी वर्नन करन बसण्यात अर्थ नाही.झाडासारख्या मित्राची नवीन ओळख करून देनारं हे पुस्तक स्वतःच अनुभवायची चीज़ आहे!

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१)म्रुत्यंजय-अगदि कुमारवयात वाचलेले हे पुस्तक नंतर अनेकदा वाचले.प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या कारणांनी आवदत गेले.वृषालीची कर्णाशी पहिली भेट तर कायम लक्षात राहिल अशीच आहे.शेवटच्या प्रकरणात अश्रू आवरणं अवघडच आहे.

२)राजा शिवछत्रपती-शिवचरित्रात हरवून गेलेल्या माणसाने लिहिलेले हे चरित्र आपल्याला वेड न लावेल तरच नवल!सर्व इतिहास माहीत असूनही प्रत्येकदा आणि पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि शिवरायांबद्दल आदर,भक्ती,प्रेम पुनःपुन्हा वाढवणारा हा इतिहास तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही 'करंटे' आहात! आई भवानीला साकडं घालणारं पहिलं प्रकरण अंगावर अक्षरशः काटे आणतं!

३)स्मृतिचित्रे- एकासाध्या सरळ गृहिणीने तिच्या साध्या सरळ भाषेत सांगितलेली स्वतःची कथा!कधी गंमतिने हसवून तर कधी मन हेलावणऱ्या प्रसंगानी डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही!जगणं किती सोपं करता येतं हे शिकायचं असेल तर वाचायलाच पाहिजे हे पुस्तक!

४)तळ्यांतल्या साऊल्या- मी पुस्तकांबद्द्ल लिहितोय आणि कवितांबद्दल एक शब्दही नाही,हे होणे नाही. पुरुषोत्तम पाटील या माणसाचे दोनच काव्यसंग्रह आतापर्यन्त प्रसिद्ध आहेत,त्यातला हा पहिला!अगदी साध्या शब्दांतल्या आणि लयीतल्या त्यांच्या कविता कितिही वेळा वाचल्या तरी मन भरत नाही!त्यांच्या कविता वाचल्यावर उमताणऱ्या प्रतिक्रिया केवळ अश्याच असतात..... 'अशक्य लिहितो हा माणुस','महान','काय पण शब्द वापरतो हा माणुस'...
'ओठांशी थेंबला चन्द्राचा उद्गार,हातघाई झाला मदालस वार' असले लिहिणारा हा माणूस तितका प्रसिद्ध नाही याचे मात्र वाईट वाटते.पुन्हा इतक्याच कवितांवर तहान भागत नाही हेही खरेच!

५)लंपन ची पुस्तके: प्रकाश नारायण संत... चारच पुस्तकं लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण करणारा लेखक! लंपनचा खट्याळपणा,त्याला होणारे निरनिराळे भास,त्याचं भावविश्व.. सगळं वाचून आपल्याही घश्यात काहीतरिच होऊ लागतं,हेच या लेखनाचं यश.यातली 'शारदा संगित' ही कथा तर वेड लावते मला!तुम्हीही वाचून वेडे व्हाच!

कितिक पुस्तकं समोर उभी राहून 'माझ्याविषयी लिही ना रे!' म्हणुन मागे लागली आहेत.पुलंचा सगळाच 'गोतावळा' आवडतो.वपुंची 'महोत्सव,तू भ्रमत आहासी वाया,ही वाट एकटीची,अशी अनेक पुस्तकं आहेत.अजूनही उल्लेखनिय म्हणजे प्रतिभा रानडे यांचं 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'!विविध विषयांवर एका विदुषीशी मारलेल्या गप्पा किती काय देऊन जातात.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१)समिधा-साधना आमटे
२)गोईण-राणी बंग
३)शाळा-मिलिंद बोकील
४)समग्र मीना प्रभू
५)संभाजी-विश्वास पाटील

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
पूर्वी लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत राणी दुर्वे यांचं एक सदर येत असे,'शेजार' म्हणून!त्यातिल लेखांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजेच 'अवघाची शेजार'! कोनत्याही पानापासून कसेही वाचत रहावे आणि नवल करावे या विविध शेजारांचे आणि ते अनुभवणाऱ्या राणी दुर्वे यांचे! माणसांची आवड,नवनव्या अनुभवांची आवड,ट्रेकींगची आवड,कवितांची आवड या समान धाग्यांमुळे त्यांनी लिहिलेलं मनात अलगद उतरतं!शेजार इतका मर्यादित canvas घेऊन किती सूदर चित्र रेखाटावं!एकेक शेजार म्हनजे एकेक समृद्ध अनुभव आहे यातला! मग ती ग्लोरीया असो की बिळातले शास्त्रिबुवा,गचागच भरलेला लेडिज डाब्यातला अडाणी बायकांचा शेजार असो की अजून कुणाचा.. असा रंगतो हा शेजार की बस्स!त्यांचं लेखन मला शांता शेळके,अरुणा ढेरे यांच्या घराण्यातलं वाटतं... जीवनावर भरभरून प्रेम करणारं आणि तितक्याच त्रयस्थपणे त्याकडे पाहणारं!
गंमत अशी की खूप जणांना या पुस्तकाविष्यी माहीत नाही असं दिसलं.पण आता माहीत झालं आहेच तर एकदा डोकावून पहा या 'शेजारात' आणि त्यातलेच होऊन जा!

Thursday, June 1, 2006

हमे तुमसे प्यार कितना…


वसंताच्या आगमनाबरोबर कोवळी लुसलुशीत पानं दिसू लागतात,सृष्टीचं रुपडंच बदलून जातं. अश्याच वसंतातल्या एका सकाळी तीच पालवी थोड्या वेगळ्याच रुपात येते.कोवळी प्रेमभावना कुठून,कशी आणि अगदी नकळत मनात उमलत जाते.असं कसं हे प्रेम,नीट उमजतही नाही आणि सुटतही नाही.व्यक्त करावं म्हंटलं तर तेही नाहीच! तिच्याशिवाय काहीच दिसत नाही पण तिच्यापर्यंत पोचवताही येत नाही.कधी उन्हाचा कहर तर कधी जीवाची घालमेल करणारा उकाडा! असाच उन्हाळा येतो.असाच जीव बेचैन होत राहतो.आणि अचानकच आकाश भरून जातं,्निळशार आकाश अगदी काळंकुट्ट होऊन जातं.मग तर बेचैनी विचारूच नका! काय कारावं हेही सुचत नाही. मग गडगडाट होऊन सगळं आभाळ वाहून जातं.प्रेम मोजता येत नाहीच.पण किती प्रेम आहे तिच्यावर हे कस्ं सांगणार?आणि मग मनातलं मळभ असंच दूर होतं.... प्रेम का अस्ं मोजता येतं?मग? नाही माहीत प्रिये,किती प्रेम आहे माझं,पण एक मात्र खरंय.. तुझ्याशिवाय जगणं नाहीच असू शकत.

हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


गहिऱ्या बासरीच्या स्वरांनन्तर ऐकू येतो किशोरचा जादूई स्वर!अगदी मुलायम आवाजात किशोर गायला लागतो आणि एका बेचैन आणि कोवळ्या प्रेमाची कथा उमलू लागते.किती खरंय नाही.. प्रेमाला कोणतं परिमाण लावणार?ते का असं मोजता येतं?ते असंच असतं.. अचानक कोसळणाऱ्या पावसासारखं! तेच सांगू जाणे.. तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे प्रिये!

कुणी असतिल असे जे प्रेमात वर्षानुवर्ष झुरत आहेत,प्रियेची वाट पहात असतिल! पण माझ्याने हे कसं बरं सहन व्हावं.

सुना गम जुदाई का उठाते है लोग
जाने ज़िन्दगी कैसे बिताते है लोग
दिन भी यहाँ तो लगे बरस के समान


सारं आयुष्य विरहात काढणारे कुणी और असतिल.. मला तर एकेक दिवस वर्षांपेक्षाही मोठा वाटतो.
प्रेमविव्हल प्रियकारचं हृदयच किशोरने आपल्या समोर उघडून दाखवलंय!
य कडव्याच्या आधी येणारं संगीत तर काय वर्णावं! वायोलिनचा आर्त स्वर,गिटारीचा हृदयाचे तार अन तार हलवणारा स्वर आणि तबल्यावर निघणारे दोलायमान मनाचे तरंग.. पुढच्या शब्दांची जादू आधीच घेऊन येतात.
प्रेमात मी किती वाट पाहू शकेन हे माहीत नाही मला ,पण एक मात्र निश्चित आहे

हमे इंतज़ार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


ही तर झाली प्रियकराची स्थिति! पण तिचं काय? तिला या प्रेमाचा थांगपत्ता आहे की नाही?
काहिही काय? असं कसं होईल...
आर्त प्रेमाची ही हाक तिला ऐकू न यायला तिचं हृदय दगडाचच हवं.मग? काय आहे तिच्या मनात?

तिचंही उत्तर आहेच की! तिचही प्रेम आहेच की.. आपले महाशय प्रेमात आज पागल झाले आहेत.. पण तिच्या मनात हा प्रेमभाव कधीच जागृत झालाय.. महाशयांना काही कळायच्या आधीच...

मै तो सदासे तुम्हरी दिवानी,
भूल गये सैंया प्रीत पुरानी,
कदर न जानी कदर न जानी


परविन सुलताना! नावंच पुरेसं आहे. एका तरल आवाजाचं मुर्तिमंत प्रतिक! त्या गातात तो मुखडा तोच आहे(गीत वेगळंच असलं तरी),पण त्यातला अंदाज़ काय वर्णावा! यातल्या ‚प्यार’ या शब्दावर जी काय करामत केलीय त्यांनी.. अहाहा! आणि ॑मगर जी नही सकते’ मधल्या ‚॑बिना’ वर तर काय कलाकुसर केलिय! त्यांनी उलगडुन दाखवलंय प्रेयसीचं मन!
मै तो सदासे तुम्हरी दिवानी...
तुला कधीच नाही कारे कळलं?तूच बहुदा विसरुन गेला आहेस ही जन्मांतरीची प्रीत. माझ्या प्रेमाची तुला कधी किंमतच नव्हती जणू!
अहाहा! इकडे तो झुरतोय प्रेमात,कळत नाहिये कसं व्यक्त करावं हे प्रेम आणि ती तर जन्मांतरीच्या प्रेमाची साद घालते आहे. काय म्हणावं अश्या मधुर प्रेमाला? अस्ं वाटत्ं की आपणच जाऊन सांगावं की बाबांनो,का झुरताय असे विरहात? दोघेही तितकेच तर व्याकूळ आहात एकमेकांसाठी! पण ते सोडून देऊयात या गाण्यावरच...

पुन्हा एकदा किशोरच्या गाण्याकडे आपोआपच माझं मन वळतं.अगदीच कोमल प्रेम ,तितकंच हळवं! मग त्यात possessiveness असणारच! त्यात गैर असं काहीच नाही.पण महाशयां्नी अगदीच सीमा गाठली आहे म्हणावं लागेल...

तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल
बडी मुश्किलों से फ़िर संभलता है दिल


प्रेमात वाटेकरी नको हे ठिकच! पण तुला दुसऱ्या कुणी बघणंही मला जाळत जातं.काय करू मी?मनाला आवर घालूनही सावरायला वेळच लागतो.तुझ्या आठवणीतही मला वाटेकरी नकोय. तुझ्या काय काय गोष्टी लक्षात आहे म्हणून सांगू?तुझं हसणं,बोलणं,बोलतांना मध्येच तिरकी मान करून बघत राहणं आणि काय काय! वेडाच झालोय म्हण ना मी तुझ्या प्रेमात!ही बेचैनी नाही मला सांगता येणार....

क्या क्या जतन करते है तुम्हे क्या पता
ये दिल बेकरार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


पण तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच अशक्य आहे! तिचा आवाज ऐकाव तर केवळ मीच,तिला पहावं तर फ़क्त मीच,ती फ़क्त माझीच असावी! अगदी विचारातही तिच्या प्रेमात मला वाटेकरी नकोय!
हेही प्रेमाचं एक रुप!
आता आपल्याला कळलंच आहे की तीही तितकीच प्रेमात आहे तर तिचीही मनःस्थिति पाहूयात की जरा...

कोई जो डारे तुमपे नयनवाँ
देखा न जाये मोसे सजनवाँ
जले मोरा मनवा जले मोरा मनवा


त्याच्या प्रेमात passion आहे तर ती थोडी अधिक मनाच्या पातळीवर दिसतेय.पण तिलाही कुठे सहन होतय त्याला कुणी पाहणं?कुणी त्याच्याशी हसून बोलत असली तरी हिचा जीव खालीवर होतो.
परविन सुलताना! मी खरं तर त्यांचं version ऐकून काही वर्षं लोटली आहेत.तसं ते मी ऐकलही खूप उशीराच.आणि आश्चर्य वाटत राहिलं,अरे हे इतकं सुंदर गीत आपण पूर्वी कसं बरं नव्हतं ऐकलं?पण बरंच झालं म्हणायचं. वयाच्या टप्प्यावर थोडि ऊशीराच भेटलेली गाणी असोत की माणसं... खूपच लक्षात राहतात... आणि आवडून गेली तर विचारूच नका! त्यामुळेच आज काही वर्षांनंतरही मला त्या गाण्यातले त्यांचे शब्दनशब्द,सूर अन सूर कानात घुमाताहेत! ’जले मोरा मनवा’ यात दोनदा येतं.पहिला वरचा सूर आणि नंतरचा खाली अलगद येणारा स्वर... अहाहा! टीपेला पोचलेला झोका तितक्याच नैसर्गिकतेने,सहजतेने खाली यावा तसा भास होतो हे ऐकतांना!
खरं तर ही दोन्ही व्हर्जन्स चित्रपटात वेगवेगळ्या वेळेला येतात.पण केवळ गीत म्हणून ऐकतांना मला त्यांचा परस्परांतला संबंध नेहेमीच जाणवतो.
भारतिय अभिजात संगिताशी सलगी साधणारं परविन सुल्ताना यांचं व्हर्जन असो की हृदयाला भिडणारं किशोरचं व्हर्जन,त्यामागे जादुगारी एकाच माणसाची.. RD! वेडं करतो खरं तर हा माणूस.. आपण किती वेळा त्याला दाद देणार? बस्स! त्याने संगितातून घोळवून काढलेली गाणी ऐकत रहावं आणि म्हणत रहावं ’सलाम RD!’

मजरूह सुलतानपुरींनी दोन्ही गीतं शब्दबद्ध केलीय.अगदी साध्या सोप्या शब्दांत खूप काही मांडून जाणं हाच मजरूह यांच्या गीतांतला स्थायीभाव!म्हणूनच तर नूतनसाठी
’चाँद फ़िर निकला मगर तुम ना आये
जला फ़िर मेरा दिल,करू क्या मै हाये’
लिहिणारे मजरूह आमिर खानसाठी ’्पापा कहते है’ लिहू शकतात आणि ट्विंकल- सलमानसाठी
’बाहों के दरमियाँ’ लिहू शकतात!
प्रियकराची अगतिकता आणि प्रेयसीचा अनुराग,दोन्ही एकाच मुखड्याच्या गीतांत उतरवतांना किती वेगवेगळे भाव ओतले आहेत!
किशोरबद्दल तर बोलावं तितक्ं थोडंच आहे! त्याच्या मर्यादांवर बोट ठेवणारेही त्याच्या तितक्याच प्रेमात असतात जितके की त्याचे die hard Fans!

प्रेमाचा अनुभव घेतल्याशिवाय नाहीच लिहू शकत हे गीत,नाहीच येऊ शकत याचे स्वर तितके मनातून! आणि अशीच वेळ असेल तीही... भुरभूर पावसाची.. तिच्या प्रेमात झुरण्याची... तिने आतून ’ओ’ देण्याची आणि हुरहुर लावणाऱ्या तिच्या उत्तराची!

उगाच हे गीत ऐकून मन हळवं होतं... उगाच कुणासाठी तरी झुरावसं वाटू लागतं... आणि झिरमिर पावसाच्या साथीनं म्हणावसं वाटतं...

... मगर जी नही सकते तुम्हारे बिना!

(मी स्वतःला संगितातला जाणकार समजत नाही.त्यामुळे ही काही गीताची समीक्षा नाही.एका दाद द्याव्याश्या वाटणाऱ्या ,आतून आनंद देणाऱ्या गाण्यातला आनंद सगळ्यांबरोबर वाटून घ्यावासा वाटला म्हणुन हा प्रपंच!)

गिरीराज

Saturday, May 27, 2006

संदीपच्या चाहत्यांसाठी :
संदीपची एक छान मुलाखत मायबोलिवर प्रसिद्ध झालि आहे. एका अर्थाने इतका प्रसिद्ध कवी मुलाखत देतांना किती सुंदर बोलतो ,कोणताही अहंभाव न ठेवता, वाचाच तुम्ही!
अगदी समोर बसून आपल्यशी बोलतोय असी ही मुलाखत झालिय!

मुलाखत खालिल दुव्यावर वाचू शकाल…

http://www.maayboli.com/hitguj/messages/34/109243.html?1148715328

(Devanaagari Font: gargi or Arial Unicode MS)

Sunday, April 30, 2006

घाटाचे आश्रमातून दिसणारे दृश्य!
गगनगिरी आश्रम!